जालना - कोरोनामुळे 22 मार्चपासून सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. दिवाळी पाडव्याच्या दिवशी आठ महिन्यांनंतर ही स्थळे पुन्हा भाविकांसाठी खुली करण्यात आली. त्यामध्ये राजूर येथील राजुरेश्वर गणपतीचाही समावेश आहे. साडेतीन पीठांपैकी गणपतीचे एक पूर्णपीठ असलेले हे मंदिर तब्बल आठ महिन्यानंतर संकष्ट चतुर्थीला भक्तांच्या वर्दळीने फुलून गेले.
लॉकडाऊन नंतरचा उत्साह -
12 मार्चला संकष्ट चतुर्थी झाल्यानंतर 22 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला व सर्वच मंदिरे बंद झाली. याकाळात शासनाच्या नियमांचे पालन करून राजुरचे गणपती मंदिरही बंद ठेवण्यात आले होते. या गणपतीच्या दर्शनासाठी फक्त पंचक्रोशीतूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱयातून भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, गेल्या आठ संकष्ट चतुर्थींना हे मंदिर बंद होते. पाडव्याच्या दिवशी मंदिर उघडल्यानंतरही शासनाच्या निर्देशाप्रमाणे सामाजिक अंतर पाळणे कठीण असल्यामुळे मंदिर प्रशासनाने भाविकांच्या गर्दीला काही प्रमाणात निर्बंध घातले होते. मात्र, काल संकष्ट चतुर्थी असल्याने भाविकांनी मंदिरात गर्दी केली. आठ महिन्यानंतर संकट चतुर्थीला गणपतीचे दर्शन झाल्याचा आनंद आबालवृद्धांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
ही आहेत गणपतीची साडेतीन पीठे -
मोरगाव -
उन्मत्त सिंदुरासुराचा वध करून त्याचा सेनापती कमलासुर याचाही वध या श्रीगणेशाने केला, अशी आख्यायिका आहे. कमलासुराचे शीर जमिनीत गाडून त्याच्यावर हा गणेश आरूढ होऊन बसला.
राजूर (जालना) -
राजूर येथील राजुरेश्वर हा साडेतीन पीठांपैकी एक गणपती आहे. याला पूर्वी राजापूर असेही म्हटले जाई. गाणपत्य संप्रदायात या स्थानाला फार महत्त्व आहे. राजा वाराण्याने प्रतिष्ठापना केलेल्या या क्षेत्राला राजूरचा 'महागणपती' म्हणतात.
पद्मालय (जळगाव) -
पद्मालय याठिकाणी दोन गणेशमूर्ती आहेत. दत्तभक्त असलेल्या सहस्रार्जुनाने स्थापन केलेला 'प्रवाळ गणेश' आणि त्याच्या शेजारी शेषाने स्थापन केलेला 'धरणीश्वर गणेश' यांचा यात समावेश होतो. एक गणेश मूर्ती उजव्या सोंडेची व दुसरी डाव्या सोंडेची आहे. जळगावातील एरंडोल गावापासून ८ किमी अंतरावर पद्मालय आहे.
अर्धपीठ श्रीक्षेत्र चिंचवड -
चिंचवडमधील हे क्षेत्र पुराणोक्त नाही. गाणपत्य साधू मोरया गोसावींमुळे याला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. मोरया गोसाव्यांना मोरगाव येथे नदीत स्नान करताना गणेशाचा तांदळा सापडला होता. त्याची स्थापना त्यांनी चिंचवड येथे देऊळवाड्य़ात केली.