जालना - रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्र सिंग यांनी बुधवारी जालना रेल्वे स्थानकाला भेट देऊन कामांची पाहणी केली. या दरम्यान ही नियमित तपासणी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अधिकाऱ्यांच्या भेटीपूर्वी मंगळवारपासून रेल्वे परिसरात स्वच्छतेच्या आणि रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र उपेंद्र सिंह यांच्यापुढे दिखावा निर्माण केल्याचेच चित्र दिसून येत होते.
उपेंद्र सिंह यांच्यासोबत वरिष्ठ वाणिज्य अधिकारी दिवाकर बाबू यांचीही उपस्थिती होती. सिंह यांनी 'गुडशेड'च्या भागातील रस्त्यांची पाहणी केली. या हॉलमध्ये रेल्वेचे भंगार साहित्य पडलेले असून मर्चंट रूमची दुरवस्था पाहून त्यांनी ही व्यवस्था बाजूलाच असलेल्या हॉलमध्ये करण्याच्या सूचना दिल्या.
हेही वाचा - अज्ञात कारणाने एकाच रात्रीत दगावल्या चार म्हशी; दूध व्यावसायिक हवालदिल
अधिकाऱ्यांचा नियोजित दौरा पाहून मंगळवारपासून रेल्वेफाटक ते रेल्वे कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले. त्याच सोबत रेल्वे परिसरात वाढलेले गाजर गवत जाळून स्वच्छ करण्याचेही काम सुरू आहे. परंतु मालवाहतुकीसाठी असलेल्या धक्क्यावर डांबरीकरण नसल्यामुळे इथे येणाऱ्या अवजड वाहनांच्या दाबाने धुळीचे प्रचंड लोळ उठतात. त्यामुळे इथे काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. याबद्दल मात्र, सिंह यांनी कोणतेही भाष्य केले नाही. दरम्यान स्थानकाची तपासणी ही नियमित तपासणी असल्याचे सांगून ते पुढील प्रवासाला निघून गेले.
हेही वाचा - रहमती पीरच्या तिसऱ्या उरुसासाठी राज्यभरातून भाविकांची हजेरी