जालना - ग्रामीण भागातील ढासळत चाललेली आरोग्यसुविधा सुधारण्यासाठी जालना जिल्हा परिषदेने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. गेल्या 3 महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्व रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयातील रजेवर असलेल्या डॉक्टरांची उपस्थिती आणि गैरहजेरी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरच दिसून येत आहे. त्यामुळे इथे हजेरी लावणाऱ्या डॉक्टरांनी संबंधित रुग्णालयात गैरहजेरी लावली तर, गावकऱ्यांनी तक्रार करता येईल, अशी सुविधा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी केली आहे.
ग्रामीण रुग्णालयाचा उपयोग संबंधित गरजुंना होत नसल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. यामध्ये विशेष करून डॉक्टर उपस्थित नसल्याच्या तक्रारींची संख्या जास्त होती. या तक्रारींची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी अरोरा यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरच डिस्प्ले लावला आहे. या डिस्प्लेवर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांची नावे, त्यांचे तालुका आरोग्य अधिकारी आणि ज्या गावात हे डॉक्टर नियुक्त आहेत, त्या डॉक्टरांची नावे आहेत. त्यापुढे शाळेमधील हजेरी पटाप्रमाणे उपस्थिती, अनुपस्थिती (प्रेझेंट-अबसेन्ट) असेही दाखविले जाते. त्यामुळे कोणता डॉक्टर कोणत्या गावात उपस्थित नाही हे आदल्या दिवशीच संबंधित यंत्रणेला कळणार आहे. त्यामुळे संबंधित ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या उपस्थिती संख्येमध्ये वाढ होईल आणि ग्रामीण जनतेला आरोग्य सेवा चांगल्या मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - कस्तुरबाडीत लाखोंचा अवैध गुटखा जप्त, बदनापूर पोलिसांची कारवाई
दरम्यान, संबंधित डॉक्टर इथे हजर दाखवत असेल आणि ते रुग्णालयात हजर नसतील तर गावकऱ्यांनी त्या डॉक्टरची ग्राहक सेवा केंद्रामार्फत ऑनलाइन तक्रार करावी. जेणेकरून या डॉक्टरांच्या पगाराविषयी निर्णय घेता येतील असेही अरोरा यांनी सांगितले. एकंदरीत ग्रामीण जनता या सुविधेबाबत फारशी जागरुक झाली नसून गेल्या ३ महिन्यांमध्ये कोणीही एकाही डॉक्टरची तक्रार घेऊन आपल्याकडे आले नाही, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
हेही वाचा - जालन्यात वारिस पठाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांनी झोडपले