जालना - नव्याने बांधण्यात आलेल्या स्त्री रूग्णालयाची तीन मजली इमारतीसाठी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नाही. घाई गडबडीमध्ये इमारतीचे उद्घाटन करण्याच्या नादामध्ये, तात्पुरते प्रमाणपत्र देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने ही इमारत आरोग्य विभागाच्या ताब्यात दिली. मात्र अद्याप येथील कामे न झाल्याने, आजही येथे अर्धवटच अग्निशमन यंत्रणा आहे.
निवडणुकांच्या तोंडावर विविध विकास कामांचा सपाटा 2019 मध्ये सुरू झाला होता. त्यातीलच ही एक इमारत आहे. इमारतीचे काम अर्धवट असतानाही केवळ आपल्या काळामध्ये ही विकास कामे झाली आहेत, असे भासविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी या इमारतीचे घाई गडबडीमध्ये उद्घाटन उरकले. परंतु त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या आणि कामे पूर्ण झालीच नाहीत. म्हणून पळवाट काढत विविध विभागाची तात्पुरते प्रमाणपत्र घेण्यात आली.
अग्निशमन यंत्रणेचे तात्पुरते प्रमाणपत्र
औरंगाबाद येथील महानगरपालिकेचे अग्निशमन विभाग प्रमुख यांनी दिनांक 9 जानेवारी 2019 रोजी वैद्यकीय अधिष्ठाता जिल्हा स्त्री आणि बाल रुग्णालय जालना यांना तात्पुरत्या स्वरूपाचे 'ना हरकत प्रमाणपत्र' दिले आहे. मात्र त्यानंतर जी कामे पूर्ण करून घ्यायची आहेत. त्याची यादी देखील प्रमाणपत्र सोबत त्यांनी दिली आहे. परंतु उद्घाटन झाले आणि ही कामे तशीच बाकी राहिली. त्यामुळे आजही ही कामे अर्धवट अवस्थेत आहेत.
याला जबाबदार कोण?
या अर्धवट कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नितीन भोसले यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, 'दिनांक दोन जुलै 2019 ला एस. रोशन नागपूर येथील एजन्सीला या अग्निशमन यंत्रनेसंदर्भात काम दिले होते आणि ते दोन महिन्यात पूर्ण करायचे होते. तेरा लाख पाच हजार रुपयांच्या या कामासाठी रुग्णालयात आवश्यक असणारी जागाच उपलब्ध झाली नाही. यासाठी जी यंत्रणा ठेवायची होती त्या खोलीला दरवाजे नसल्यामुळे महत्त्वाचे साहित्य तिथे ठेवता आले नाही. त्यासोबत निविदा काढताना अनेक कामे यामध्ये बाकी राहिली होती. त्यामुळे आता पुन्हा या उर्वरित कामांच्या 3 लाखाच्या निविदा काढण्यासाठी अंदाजपत्रक दिले आहे आणि पुढील आठ दहा दिवसात या निविदांची प्रक्रिया पूर्ण होऊन फेब्रुवारी शेवटपर्यंत या स्त्री रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित होईल.'
हेही वाचा - लसीकरणाची तयारी पूर्ण, कोणती लस द्यायची या विषयी संभ्रम
हेही वाचा - बर्ड फ्लूमुळे काळजी घेणे आवश्यक, आरोग्य मंत्र्यानी दिली माहिती