जालना - दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित दर्पण दिनाच्या कार्यक्रमात वृत्तपत्रांच्या टायटलचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या क्षेत्राशी काहीही संबंध नसलेल्या व्यक्तीने केवळ वृत्तपत्र टिकावे व नवीन पिढीला या विषयी माहिती व्हावी या उद्देशाने हे प्रदर्शन भरविले होते.
तीनशे वृत्तपत्रांची टायटल
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहामध्ये दर्पण दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात जालना शहरातील विविध वस्तूंचे संग्रह करणारे लक्ष्मीकांत देशमुख यांनी हे प्रदर्शन भरविले होते. हिंदी, मराठी, इंग्रजी आदी विविध भाषांमधील वृत्तपत्रांच्या टायटलचे म्हणजेच वृत्तपत्रांच्या नावाचे कात्रण तर जी वृत्तपत्र मिळाली अशा वृत्तपत्रांचा संग्रह इथे पहायला मिळाला. सुमारे तीनशे वृत्तपत्रांची टायटल येथे उपलब्ध होती. यामध्ये अनेक वृत्तपत्रांची नावे ही विनोदी, गमतीदार होती. त्यामुळे नवीन पिढीला कधीही माहीत नसलेले ही नावे इथे वाचून एक वेगळाच आनंद मिळाला.
ज्ञानामध्ये पडते भर
कोरोनाच्या काळात जवळपास सर्वच वृत्तपत्रे बंद होती. त्यामुळे डिजिटल मीडिया आणि मोबाईलकडे मोठा वर्ग वळला आहे. मात्र, या प्रकारामुळे ज्ञानात भर पडते. पण, कायमस्वरूपी ते टिकत नाही. ते टिकविण्यासाठी वृत्तपत्र वाचणे हा एकमेव पर्याय असल्याचेही लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले. या वाचनामुळे सखोल ज्ञान मिळते आणि ते मेंदूमध्ये साठविले जाते. त्यासोबत वृत्तपत्रात येणारे शब्दकोड सोडविल्यामुळे बहुपर्यायी शब्द शोधण्यासाठी आपली धडपड होते. सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी वृत्तपत्रा शिवाय पर्याय नाही, असे त्यांचे मत आहे. त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा, लोकसेवा आयोगाच्या परीक्षा द्यायच्या आहेत त्यांनी अशा प्रकारचे ज्ञान आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे, असेही सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून या वृत्तपत्रांची कात्रणे येथे आहेत.
हेही वाचा - बदनापुरात 28 वर्षांनंतरही क्रीडा संकुलाचा प्रश्न लागेना मार्गी
हेही वाचा - संक्रांतीनिमित्त 'घेवर'च्या मागणीत वाढ, जालन्यात थाटली 'घेवर'ची दुकाने