जालना - कोणाचेही निधन ही दु:खद गोष्ट आहे. मात्र, या दुःखातही आनंद शोधणाऱ्या विचारांची पेरणी मंठा तालुक्यातील लिंबेवडगाव येथे रविवारी करण्यात आली. गावातील महानंदा सोपानराव खरात (वय 50) यांचे गेल्या महिन्यात २६ नोव्हेंबरला निधन झाले होते. त्यांच्या तेराव्या दिवसाचा कार्यक्रम रविवारी ८ डिसंबरला होणार होता. मात्र, त्यांच्या परिवाराने तेराव्याच्या अन्नदानावर होणारा खर्चाची बचत केली आणि त्यातून उरणारी रक्कम गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना पाणीपुरवठ्यासाठी दिली.
तेरावा दिवस म्हटले की नातेवाईकांशिवाय अन्य गावकरी जेवणासाठी टाळाटाळ करतात. मात्र, तरीदेखील तयारी करावी लागते. यातून उरलेले अन्न फेकून द्यावे लागते. म्हणून खरात कुटुंबीयांनी हा अनाठायी खर्च वाचवला आणि शाळेसाठी 21 हजार 111 रुपये एक हजार लिटरची पाण्याची टाकी, हौद आणि अन्य साहित्यासाठी दिले आहे.
हेही वाचा - 28 दिवसांनंतर लतादिदींना मिळाला 'ब्रीच कँडी'तून डिस्चार्ज, मानले सर्वांचे आभार
त्यांच्या या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्याची सुविधा झाली आहे. या शाळेत सुमारे दीडशे विद्यार्थी पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेतात. रविवारी सुट्टीचा दिवस असताना सर्व गावकरी विद्यार्थी आणि परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला. तर एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू अशी परिस्थिती यावेळी खरात परिवाराची झाली होती.