जालना - घनसावंगी तालुक्यातील देवीदहेगाव येथिल अनिकेत भाऊसाहेब घुगे (15) हा 1 ऑगस्टपासून बेपत्ता होता. याचप्रकरणी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी अखेर अनिकेतची हत्या झाल्याची माहिती पुढे आली आहे. शिवाय या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील काही संशयितांची कसून चौकशी करण्यात आली. यादरम्यान घटनेच्या रात्री उशिरा यातील एक संशयित आरोपी गावाबाहेरून येताना काही ग्रामस्थांनी पाहिले होते. या एका धाग्याच्या आधारे पोलिसांनी त्या संशयितांची कसून चौकशी केली असता, त्याने एका साथीदारासह हत्या केल्याची कबुली दिली आहे. देवीदहेगाव शिवारातील गोरखनाथ काळे यांच्या उसाच्या शेतात नेऊन अनिकेत घुगे याच्या डोक्यात दगड मारून हत्या करण्यात आल्याची कबुली महादेव नामदेव शिंदे आणि आकाश भागवत शिंदे यांनी दिली आहे. हे दोन्ही आरोपी 19 वर्षाचे असून त्यांना जेरबंद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, घनसावंगीचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पतंगे यांनी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घटनास्थळी भेट दिली. आठ दिवसापूर्वीची घटना असल्याने मृतदेह पूर्णपणे कुजला होता. त्यामुळे घटनास्थळीच वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून आज (रविवारी) शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी आरोपी विरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यासह अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -विशेष : हुंडाबंदी कायद्याच्या साठीनंतरही महिलांचा छळ; लातूरमधील परिस्थिती काय?