जालना - राज्य सरकारकडून येणारी मार्गदर्शक तत्वे वारंवार बदलत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाला देखील काय निर्णय घ्यावा या संभ्रमात आहे. परप्रांतीयांना परत जाण्यासाठी दिली जाणारी परवानगी ही एक अडचणीची बाब ठरत आहे. ऑनलाइन अर्ज करणे परप्रांतियांना येत नसल्यामुळे अनेक जण तहसील कार्यालयामधून जिल्हाधिकारी कार्यालय आणि तेथून पुन्हा तहसील कार्यालय त्यानंतर फिटनेस सर्टिफिकेटसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अशा तिन्ही ठिकाणी खेटे घालून त्रासले आहेत.
ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय या प्रमाणपत्राच्या प्रिंट निघत नाहीत आणि या प्रिंट काढण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे फिटनेस सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. त्यामुळे सामान्य रुग्णालयात रांगेत उभे राहणारे हे परप्रांतीय मोठ्या संख्येने आहेत. त्यानंतर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तो जिल्हाधिकारी कार्यालयात तपासला जाऊन त्यातील त्रुटी दूर केल्या जातात. कागदांची पूर्तता केलेल्या अर्जांना परवानगी मिळते. हे अर्ज तहसील कार्यालयातून संबंधिताला वाटप केले जात आहेत. यासाठी तहसील कार्यालयात वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळ्या खिडक्यांमध्ये व्यवस्था केलेली आहे.
प्रशासनाने चांगली उपाययोजना केली आहे. मात्र, परप्रांतीयांना ऑनलाईन अर्ज करताना येणाऱ्या अडचणी सोडवणे मुश्कील जात आहे. त्यामुळे परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांना खूप अडचणी येत आहेत. या अडचणी लक्षात घेता प्रशासनाने आता परराज्यात जाणाऱ्या व्यक्तीने जिल्हा सामान्य रुग्णालयाचे प्रमाणपत्र घेऊन प्रवास करावा अशा प्रत्यक्ष सूचना दिल्या आहेत. त्यामुळे हा ऑनलाईनचा त्रास आता कमी होणार आहे. मात्र, रेड झोनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी हा नियम लागू आहे.