जालना - जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी विविध विभाग करण्यात आले आहेत. या इमारतीसमोरच एक नवीन कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे तर इमारतीच्या दक्षिण बाजूला परिचर्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये आणखी एक कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये हे कोरोनाबाधित रुग्णांचे अत्यंत हाल होत आहेत.
सध्याच्या रुग्णांना स्नानासाठी गरम पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे हे रुग्ण चार-चार दिवस स्नानापासून वंचित राहत आहेत. नंतर नाईलाजाने मिळेल त्या पाण्याने स्नान करावे लागत आहे. विशेष म्हणजे अशा रुग्णांसाठी गरम पाणी अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासन सांगत आहे. त्यासोबत या रुग्णांना देण्यात येणारे जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पोहे किंवा कडधान्याची उसळ येथे आणि या उसळीमध्ये, पोह्यामध्ये हे कागदाचे तुकडे माती सदस्य पांढरे खडे आणि अन्य ओळखू येणारे पदार्थ निघत आहेत. तरीदेखील हे प्रशासन या पुरवठाधारकाला का पोसत आहेत, हा एक अनुत्तरित प्रश्न आहे?
कळस म्हणजे या रुग्णालयात एकीकडे महिला आणि दुसरीकडे पुरुष असे रुग्ण आहेत आणि ह्या दोघांच्याही शौचालयाची खिडकी समोरासमोर आहे. मात्र, या खिडक्यांना काचा नसल्यामुळे एका शौचालयातून दुसरे शौचालयात असलेली व्यक्ती स्पष्टपणे ओळखू दिसत आहे. त्यामुळे महिलांची प्रचंड कुचंबणा होत आहे. शौचालयाला गेल्यानंतर पलीकडच्या वॉर्डातून कोणी पुरुष बघेल का? हा मानसिक तणाव या महिलांवर येत आहे. त्यामुळे आजार बरे होण्याचे सोडून वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरेतर आजारी माणसासाठी गरम पाणी, स्वच्छ आणि वेळेवर अन्नपुरवठा, शौचालयांची स्वच्छता या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मात्र, या सर्व प्रकाराकडे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे प्रशासन मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. या सर्व गडबडीमध्ये सुरुवातीपासून कोव्हिड-१९ या आजाराची जबाबदारी ज्या जिल्हा शल्यचिकित्सकांवर होती. त्या डॉक्टर मधुकर राठोड यांची बदली करून त्याजागी आता श्रीमती भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अजून कर्मचाऱ्यांच्या ओळखी, बैठका यातच वेळ जात असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर त्यांचा वचक अजून बसलेला नाही. याचाच फायदा हे कर्मचारी घेत असल्याची चर्चा सध्या होत आहे.