जालना - मोठमोठ्या वाहनात अधिक प्रवासी भरणे सोपे जात असल्यामुळे अनेक क्रुझर वाहन चालक जालना रेल्वे स्थानकावर उभे असते. या वाहनांच्या मदतीने येथे अवैधरित्या प्रवासी वाहतुक केली जाते. त्यामुळे त्रस्त रिक्षा चालकांनी थेट जालना पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार कदीम जालना पोलिसांनी या परिसरात झाडाझडती घेतली. या वेळी पोलिसांनी पाच वाहने ताब्यात घेतली.
हेही वाचा... गाण्यातून जाणून घ्या काय आहे कोरोना?, वर्ध्यात वैदकीय जनजागृती मंचाचा उपक्रम
सध्या विदर्भात सैलानी बाबा यांच्या यात्रेची धूम सुरु आहे. या यात्रेला जाण्यासाठी जालना रेल्वे स्थानकातून मोठ्या प्रमाणात प्रवासी मिळतात. काही चालक या प्रवाशांना आपल्या मोठमोठ्या वाहनात भरुन घेऊन जातात, यामुळे त्रस्त रिक्षा चालकांनी थेट पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली होती.
बाहेरगावाहून आलेले यात्रेकरू जालना येथे जेवणाची मोफत व्यवस्था असल्यामुळे थांबतात. रात्री जेवण करतात आणि रेल्वे स्थानकातच जागा मिळेल तिथे बस्तान मांडतात. त्यानंतर पहाटे सैलानी बाबा यात्रेकडे जाण्यासाठी रवाना होतात. त्यावेळी क्रुझर चालक या प्रवाशांना कमी पैशाचे आमिष दाखवत, एका एका वाहनांमध्ये 20 ते 25 प्रवासी भरतात. या अवैध प्रवासी वाहतूकीसोबतच रात्रीच्या वेळी त्यांचा रिक्षाचालक, प्रवाशांना देखील त्रास होत असल्याचा आरोप रिक्षाचालकांनी केला होता. त्यानुसार कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेळके, सहायक पोलीस निरीक्षक सोनवळे, सोमनाथ लहामगे आदींनी ही कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी पाच क्रुझर वाहने ताब्यात घेतली.