जालना - जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील रहिवासी असलेले जवान सतीश सुरेश पेहरे (28) यांना लडाख येथील एका भीषण अपघातात वीरमरण आले आहे. मूळ बुलढाणा जिल्ह्यातील सुरेश पेहरे हे जालन्यात स्थायिक झाले होते. लष्करात पूल बांधकाम विभागामध्ये अभियंता म्हणून ते कार्यरत होते. लडाखजवळील शाखा नदीच्या पुलावर बांधकाम सुरु असताना घडलेल्या अपघातात पेहरे यांना वीरमरण आले आहे.
दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अमोना या गावचे पेहरे हे मूळ शेतकरी कुटुंब. मात्र, गेल्या काही वर्षांपूर्वी ते जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथे स्थिरावले होते. जवान सतीश पेहेरे यांच्या पश्चात वडील सुरेश पेहरे, आई अलका पेहरे, पत्नी जया पेहरे आणि त्यांचा दीड वर्षांचा मुलगा आहे.
हेही वाचा - ' ज्योतिरादित्य आणि सचिनच्या रुपाने राहुल गांधींनी आपले दोन्ही हात गमावले..'
विशेष म्हणजे सतीश पेहरे यांसह ते तिघेही भाऊ सैन्यामध्येच आहेत. सतीश पेहेरे हे मधले भाऊ होते. प्राप्त माहितीनुसार सतिश पेहरे यांचा मृतदेह उद्या (गुरुवार) संध्याकाळी खास विमानाने साडेआठ वाजता औरंगाबाद विमानतळावर पोहोचणार आहे. त्यानंतर वरुड येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. यासंदर्भात जाफराबादचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनी वरुड येथे जाऊन सतीश पेहरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.