जालना - रेल्वे स्थानकातून दादरला जाणारी जनशताब्दी रेल्वे क्रमांक १२०७२ आणि दादरहून जालन्याला येणारी जनशताब्दी क्रमांक १२०७१ या दोन्ही गाड्या बुधवारी एका दिवसासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई विभागात मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार डोंबिवली ते कल्याण दरम्यान पादचारी पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळ बुधवारी या दोन्ही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या प्रवाशांनी आरक्षण केले आहे अशा प्रवाशांचे तिकीट रद्द करून तिकिटाची पूर्ण रक्कम परत देण्यात येत आहे. रेल्वेच्या वतीने गाडी रद्द केल्यामुळे तिकिटाची पूर्ण रक्कम परत दिली जात आहे. अचानक रेल्वे रद्द झाल्यामुळे नियोजित प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे मात्र हाल होणार आहेत. यासंदर्भात रेल्वेचा कोणताही अधिकारी माहिती देण्यास तयार नाही.
रेल्वे रद्द केल्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने चौकशी कार्यालयाच्या बाहेर कसल्याही प्रकारचा सूचना फलक लावलेला नाही. बुधवारी रेल्वे रद्द झाली आहे हे माहीत असताना देखील आज सकाळी साडेअकराच्या सुमारास बुधवारच्या जनशताब्दी रेल्वेचे तिकीट प्रवाशांना दिली गेली. मात्र, परत रेल्वे रद्द झाल्याचा संदेश मोबाईलवर गेल्यामुळे प्रवाशांची तिकीट रद्द करण्यासाठी गर्दी झाली आहे.