जालना - येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात 30 वर्षांपूर्वी प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींची पुन्हा एकदा शाळा भरली. निमित्त ठरले, कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन. त्यांनी त्यावेळच्या सर्व साथीदारांना पोलीस प्रशिक्षण घेऊन 31 ऑक्टोबरला तीस वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यासाठी एक नोव्हेंबर रविवारी जालन्यात निमंत्रित केले होते. त्यांच्या या निमंत्रणाला 1990 च्या बॅचमधील 25 पोलीस अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेतले त्याच ठिकाणी परत तब्बल 30 वर्षांनी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. यामुळे पोलीस शिपायाचे पोलीस अधिकारी झालेल्या मित्रांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
पुणे येथे 1990 मध्ये पोलीस भरती झाली होती. यात भरती झालेल्या पोलीस शिपायांना जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात 1990 ते 1991 या वर्षामध्ये प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणादरम्यान त्यावेळी म्हणजेच सुमारे तीस वर्षांपूर्वी या पोलिसांनी वृक्षारोपण केले होते. श्रमदानातून ओढाही खोदला होता. त्यावेळी केलेल्या कामाचीची पाहणी करण्यासाठी आणि आठवणींना उजाळा देण्यासाठी हे सर्व जण येथे आले होते. या सर्वांचा महत्त्वाचा एक दुवा म्हणजे याच टीममधील त्यावेळी पोलीस शिपायाचे प्रशिक्षण घेतलेले आणि आज कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन. त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
महाजनांनी घेतला पुढाकार
महाजन यांनी 1990 मध्ये येथे प्रशिक्षण घेतलेले असल्यामुळे जालना प्रती त्यांचा ओढा आजही कायम आहे. त्यावेळच्या सर्व साथीदारांना पोलीस प्रशिक्षण घेऊन 31 ऑक्टोबरला तीस वर्षे पूर्ण झाले आणि त्यानिमित्ताने वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यासाठी एक नोव्हेंबर रविवारी जालन्यात निमंत्रित केले होते. त्यांनी त्यावेळी केलेल्या सर्व कामांची पाहणी केली. तसेच जालना शहरातील कदिम जालना पोलीस ठाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडत पडला होता, तो प्रश्न सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावून कदिम जालना पोलीस ठाण्याचे स्थलांतर केलेल्या पोलीस ठाण्याची ही पाहणी केली आणि वृक्षारोपण केले.
25 अधिकारी होते उपस्थित
ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेतले त्याच ठिकाणी परत 30 वर्षांनी एकत्र येऊन आठवणींना उजाळा मिळाल्यामुळे पोलीस शिपायाचे पोलीस अधिकारी झालेला या मित्रांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. विशेष म्हणजे बोलावलेल्या अधिकाऱ्यांपैकी 25 अधिकारी काल उपस्थित होते. हे सर्वजण सध्या पुणे येथे विविध पोलीस ठाण्यांमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत.
पुन्हा येऊन पाहणी करणार
कदिम जालना पोलीस ठाणे परिसरात या पोलिस अधिकाऱ्यांनी वृक्षारोपण केले. ज्याप्रमाणे तीस वर्षांपूर्वीच्या वृक्षांची जोपासना करून पोलीस प्रशिक्षण केंद्रात निसर्गरम्य वातावरण तयार झाले आहे. तसेच वातावरण कदिम जालना पोलीस ठाण्याच्या परिसरात देखील झाले पाहिजे. म्हणून पुन्हा येऊन आज लावलेल्या झाडांची पाहणी करणार असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.