जालना - मराठवाडा ही संतांची भूमी आहे. या मातीवर, येथील माणसांवर संतांनी संस्कार केले आहेत. अशा या पावन भूमीत आपल्यावर झालेल्या संस्कारांची शिदोरी सोबत ठेवून मराठवाड्याला विकासाच्या वाटेवर पुढे नेऊ या, असे आवाहन जालन्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज केले. आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस आहे. त्यानिमित्त जालना शहरातील नगर भवन परिसरात असलेल्या मराठवाडा मुक्ती स्तंभाला पालकमंत्री राजेश टोपे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - मुंबईत ५ लाखांहून अधिक अमली पदार्थाचे व्यसनी, दररोज 500 किलो ड्रग्जचे सेवन
पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले की, मराठवाडा हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला भाग आहे. येथील महत्त्वाचा उद्योग म्हणजे शेती आहे. मात्र, शेतीवर वारंवार नैसर्गिक संकट येत आहेत. या संकटातून शेतकर्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. यामधून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही टोपे यांनी सांगितले.
या मनोगतापूर्वी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.