बदनापूर (जालना) - बदनापूरपासून जवळच असलेल्या नूर हॉस्पिटलसमोरील चेक पोस्टवर औरंगाबादच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनात चक्क दारूच्या बाटल्या आणि 6 लक्ष 70 हजार रुपये आढळून आले आहेत. संबंधित प्रकरणी बदनापूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शासनाचे मुख्यालाय सोडू नये, असे आदेश असतानादेखील संबंधित अधिकारी मुख्यालय सोडून जालना जिल्ह्यात आढळला आहे.
कोरोना रोगाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी सध्या जिल्हाबंदी आहे. यासाठी जालना ते औरंगाबाद या महामार्गावर बदनापूरपासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या वरूडी येथील नूर हॉस्पिटलसमोर चेक पोस्ट तयार करण्यात आलेले असून, या ठिकाणी जालना पोलीस आणि औरंगाबाद पोलिसांचे दोन्ही बाजूनी चेक पोस्ट आहे. औरंगाबादकडे जाणारी वाहने औरंगाबाद पोलीस तपासतात तर जालनाकडे येणारी वाहनांची तपासणी जालना पोलीस करत असतात. या ठिकाणी तपासणी करत असताना संचारबंदीतून सूट असलेल्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांनाच जाऊ दिले जाते नसता ते वाहन परत पाठवले जाते.
औरंगाबाद येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांचे शासकीय वाहन आज औरंगाबादकडून जालनाकडे जात असताना जालना पेालिसांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार सदर वाहन तपासणी केली. चारचाकी मोटार (क्रमांक-एमएच 20 सीयू 0353) या वाहनाच्या समोरील काचेवर औरंगाबाद शहर पोलिसांनी संचारबंदी दरम्यान दिलेला परवाना लावलेला होता. असून त्यावर आरोग्य विभाग अत्यावश्यक सेवा, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद औरंगाबाद असे प्रिंट करून लावलेले आहे. या प्रिंटवर भारत सरकारची मुद्रा तसेच आरोग्य विभागाचा लोगो असून वाहनाच्या पुढील व मागील दर्शनी भागात महाराष्ट्र शासन असे लिहिलेले आहे.
हे वाहन औरंगाबादकडून जालनाकडे जात असताना वरूडी येथील चेक पोस्टवर जालना जिल्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक शिवसिंग बहुरे, वाहन निरीक्षक शरद टेरटे, आरोग्य विभागाचे एस. एन. महेश्वर, ए. एन. गोरवाडकर, जी. एस. चव्हाण, पी. पी. साळवे, उदय सिंग जारवाल, राठोड, शेख इरफान, दत्ता पवार, पाराजी बोरुडे आदींचे पथक कार्यरत होते. या पथकाने या वाहनाची तपासणी केली असता या वाहनात दारूच्या बॉटल व काही रक्कम आढळून आल्यामुळे या पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक बहुरे यांनी हे वाहन बदनापूर येथील पोलीस ठाण्यात आणून पंचनामा केला असता या वाहनात विदेशी दारूच्या मोठ्या २ बॉटल व 6 लक्ष 70 हजार रुपये आढळून आले.
या वाहनात जिल्हा परिषद औरंगाबादचे जिल्हा आरेाग्य अधिकारी डॉ. अमोल गीते हे प्रवास करत होते. या बाबत पोलीस उपनिरीक्षक शिवसिंग सुप्पडसिंग बहुरे यांनी तक्रार दिली.