जालना - शासकीय कर्मचाऱ्यांनी फक्त परिवाराचा विचार करू नये आणि केवळ पगारासाठी नोकरी करू नये. नोकरी ही जनतेचे कामे करण्यासाठी आहे, हे लक्षात ठेवावे आणि त्या पद्धतीने काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी केले.
पोस्टाच्यावतीने डाक मेळाव्याचे आज(शुक्रवार) आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुकन्या समृद्धी योजनेसंदर्भात पोस्टाने पूर्ण केलेल्या उद्दिष्ट संदर्भात त्या बोलत होत्या. अरोरा म्हणाल्या सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ फक्त ७०० मुलींना मिळाला याने उद्दिष्ट पूर्ण झाले असे म्हणता येणार नाही. हे उद्दिष्ट लाखांमध्ये असायला पाहिजे. मात्र, शासकीय कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे ही योजना मागे पडली आहे. परंतु, पोस्टाने शिक्षण विभागासोबत पाठपुरावा करून काम केले तर जिल्ह्यातील सर्व शाळांमधून मुलींसाठी असलेली ही सुकन्या समृद्धी योजना आपण राबवू, असे आश्वासन त्यांनी दिले.
हेही वाचा - सामान्यांच्या रुग्णालयात नेत्यांसाठी पायघड्या; मात्र, रुग्णांसाठी मरण यातना
यावेळी पोस्टाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या एजंटचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोस्टाच्या विविध योजनांसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाला बी. अरुमुगम, डायरेक्टर पोस्ट सर्विसेस, बी .के. राहुल, नगरसेविका संध्या देठे, यांची उपस्थिती होती. तर, टी.एफ. तडवी उपाधिक्षक, श्रीमती हिंगावार, आशुतोष गायकवाड, संतोष शिंदे आदी कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.
हेही वाचा - सहा महिन्यात 'ड्रायपोर्ट' सुरू होण्याची शक्यता; संजय सेठींनी केली पहाणी