जालना - जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पहिल्याच पावसात ग्रामीण भागांमध्ये दाणादाण उडाली. यामध्ये 10 शेळ्या आणि एका बैलाचा मृत्यू झाला. मोठाली झाडे रस्त्यावर पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. तर, ग्रामीण भागातील काही घरांवरचे पत्रे उडाले.
साळेगाव येथील रघुनाथ लालशिंग आडे यांच्या शेतात पाचच्या सुमारास वीज पडली. अंगावर वीज पडल्यामुळे उद्धव नारायण काकडे यांच्या 6, तर, जानकीराम धोंगडे यांच्या ४ शेळ्यांचा मृत्यू झाला. निपाणी पोखरी येथे जगन्नाथ जिजाभाऊ देशमुख यांचाही एक बैल अंगावर वीज पडल्यामुळे ठार झाला. घनसांगी तालुक्यातील पाणीवाडी येथे सोसाट्याचा वारा आल्यामुळे गावातील अनेक घरावरील पत्रे उडून गेले. मोठमोठी झाडे उन्मळून पडली. प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वारावरच झाडाच्या फांद्या पडल्या. मात्र, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.