जालना - सामाजिक वनीकरण विभागाच्या वृषाली बाळकृष्ण तांबे (३०) यांना एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या ४ जणांना सदर बाजार पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात वापरण्यात आलेली स्विफ्ट कारही पोलिसांनी जप्त केली आहे.
वृषाली तांबे या शुक्रवार दिनांक ९ रोजी सायंकाळी ६च्या सुमारास त्यांच्या कन्हैयानगर येथील कार्यालयात काम करत होत्या. त्यावेळी याच भागात राहणारे दिलीप भालचंद्र डोंगरे आणि रामदास प्रल्हाद दाभाडे हे कार्यालयात आले आणि श्रीमती तांबे यांच्याकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर तुमचे बँकेतील लेबर व मुकादम यांच्यामधील देवाण-घेवाणीचे कागदपत्रे आमच्याकडे आहेत, असे म्हणून या व्यवहाराची कागदपत्रे श्रीमती तांबे यांना दाखविली. तसेच तुम्ही केलेला भ्रष्टाचारदेखील उघडा पाडू असे म्हणाले. तसेच तुम्ही दिलेले चेक यावर तुमच्या सह्या आहेत तेदेखील उघडे करू, परंतु तुम्ही मला बहिणीसारख्या आहात म्हणून मी तुम्हाला सांभाळून घेण्यासाठी आलो आहे, असे म्हणत त्यांनी आयडीबीआय बँकेतील या व्यवहाराचे स्टेटमेंट दाखवले.
यासोबत सामाजिक वनीकरण विभागाचे मुकादम देवानंद घायाळ यांनी बँकेतून परस्पर पैसे काढले आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करू नका. जर तुम्ही गुन्हा दाखल केला तर चांगले होणार नाही कारण देवानंद घायाळ हा आमचा माणूस आहे. त्यामुळे, तुमचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी तुम्हीच मला एक कोटी रुपये द्या. अन्यथा तुमची नोकरी जाऊ शकते, अशा प्रकारची धमकी देऊन खंडणी मागितली.
याप्रकरणी वन लागवड अधिकारी तांबे यांनी सदर बाजार पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाची शहानिशा केली. आणि दिनांक १३ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सापळा रचून वरील २ आरोपींसह त्यांचे सहकारी दिलीप भालचंद्र डोंगरे आणि काशिनाथ मगरे अशा एकूण चौघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून धमकी देण्यासाठी वापरण्यात आलेली कागदपत्रे, ४ मोबाइल आणि एम.एच २१ बी एच १५१९ ही स्विफ्ट डिझायर कार जप्त केली आहेत. या प्रकरणी आयडीबीआय बँकेत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी या चारही आरोपींना मदत करून या विभागाच्या बँकेतील खात्याविषयी माहिती पुरवली असल्याचे सांगण्यात येत आहे.