जालना - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान पार पडले. या टप्प्यात जालना मतदारसंघातही मतदान झाले. येथील उमेदवारांचे भवितव्य आता ईव्हीएममध्ये सीलबंद झाले आहे. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांची यामधून सुटका झालेली नाही. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सर्व ईव्हीएम मशीन एकत्र करून सुरक्षा कक्षात सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. या सर्व ईव्हीएम मशीन जालना-औरंगाबाद रस्त्यावरील संकेत फूड प्रॉडक्ट या बंद पडलेल्या कंपनीच्या गोदामांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. याच ठिकाणी दिनांक २३ मे'ला मतमोजणी होणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात मतदान झाल्यानंतर जालना लोकसभा मतदारसंघातील जालना, भोकरदन, बदनापूर, सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण या ६ विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन मंगळवारीच जमा करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज सकाळपासूनच जमा झालेल्या मशीन सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि मतमोजणी सुरळीत पार पडावी या उद्देशाने संकेत फूड प्रॉडक्ट्सच्या गोदामात सुरक्षितरित्या सील बंद करण्यात आल्या. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ही तैनात होता.
विविध मतदारसंघातून आलेल्या या पेट्या सुरक्षा कक्षामध्ये जमा करताना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधिक्षक चैतन्य, यांच्यासह लोकसभेची निवडणूक लढलेले उमेदवार गणेश चांदवडे, नंदा पवार, यांची उपस्थिती होती.
या गोदामात ६ विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने ६ सुरक्षा कक्ष तयार करण्यात आले आहेत. या सुरक्षा कक्षांच्या बाजूलाच असलेल्या मोठ्या हॉलमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यादृष्टीनेही येथे फेरबदल करणे सुरू आहे. आज सर्व मतपेट्या जमा झाल्यानंतर हा पूर्ण परिसर केंद्रीय राखीव दल आणि राज्य राखीव दल यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
दररोज येथे ६ अधिकारी आणि ५८ कर्मचारी या ठिकाणी सुरक्षिततेसाठी तैनात राहणार आहेत. २३ मे रोजी मतमोजणी होणार असून तोपर्यंत या संपूर्ण परिसराची जबाबदारी या दोन्ही बलावर आहे. सहा विधानसभा मतदारसंघातून आलेल्या या मत पेट्यांमध्ये २० उमेदवारांचे नशीब बंद आहे. कोणत्या उमेदवाराची लॉटरी लागली हे कळण्यासाठी मात्र मतदारांना आणि लोकप्रतिनिधींना दिनांक २३ मे च्या दुपारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.