जालना - महामार्गाच्या रुंदीकरणामध्ये २००-३०० वर्षांपूर्वीच्या झाडांची तोड झाली आहे. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार एक झाड तोडल्यानंतर ३ झाडे लावायला पाहिजेत. परंतु, असे झाले नाही. या परिस्थितीला जबाबदार धरून संबंधित यंत्रणेवर गुन्हे दाखल करावेत, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
महाराष्ट्रामध्ये रस्त्यांचे रुंदीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. हे रुंदीकरण करत असताना वर्षानुवर्ष जुनी झाडे तोडावी लागली. परंतु, न्यायालयाच्या एकास तीन वृक्ष या आदेशाचे संबंधित यंत्रणेने पालन केले नाही. त्यामुळे जी झाडे होती ती तोडून टाकल्याने पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे.
याबाबत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना झाडे तोडणार्यावर काय कारवाई करणार? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, की मागील ४-५ वर्षात रस्त्याच्या रुंदीकरणामुळे झाडे तोडण्याचे काम शासनाकडून झाले. हे खरे आहे. मात्र, तोडलेल्या झाडाच्या बदल्यात पुन्हा नवीन झाडे लावण्याचे काम संबंधित यंत्रणेचे आहे. परंतु त्यांनी ती का लावली नाहीत तसेच मागील ४ वर्षात किती झाडे तोडली आणि किती लावली ? त्यापैकी किती जगली ? याची चौकशी करावी. तसेच झाडे न लावणाऱ्यावर न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी विनंती नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
त्याचप्रमाणे ३३ कोटी झाडे लावण्याचा संकल्प वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. परंतु झाडे लावण्यापेक्षा ती जगवणे महत्वाचे असल्यामुळे ती जगवायची कशी ? याविषयी देखील चर्चा करण्यात आली आहे. वनमंत्र्यांनी ही झाडे अशासकीय संस्था, उद्योजक, पर्यावरण प्रेमी, यांची मदत घेऊन ती जगवले जातील, असा विश्वास आपल्याला दिला असल्याचेही रामदास कदम यांनी सांगितले.