बदनापूर (जालना) - राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे बसेस आणि इतर खासगी वाहने बंद करण्यात आली असल्यामुळे अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांचे आतोनात हाल होत आहेत. वाहनांची व्यवस्था नसल्याने मुंबई, पुणे,औरंगाबाद आदी शहरात अडकून पडलेले मजूर महिला, पुरुष हे आपल्या चिमुकल्या लेकरांसह औरंगाबाद जालना महामार्ग रस्त्याने पायी निघाले. असे असतानाच बदनापूर आणि जालना शहरातील काही इंग्रजी माध्यम शाळांच्या चालकांनी माणुसकीचे दर्शन घडवीत पायी गावी निघालेल्या नागरिकांना ८ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. बदनापूर येथील आर. पी. इंटरनॅशनल शाळेच्या वतीने बसेस उपलब्ध झाल्याने पायी निघालेल्या लोकांना दिलासा मिळाला आहे.
औरंगाबाद-बदनापूर-जालना या मार्गावरून दररोज हजारो मजूर पायपीट करीत जात असल्याचे चित्र दिसत आहे. लहान मुलं आणि डोक्यावर ओझे घेऊन कडक ऊन्हामध्ये असा त्रास सहन करीत मजूर विदर्भातील आपल्या गावाकडे जात आहे. पायी चालताना अनेकांच्या पायाला फोड आल्याचे दिसून आले तर अनेक जण पायी चालून थकल्याने झाडाखाली विश्रंती घेत होते.
माणुसकीचे दर्शन -
मजुरांचे आतोनात हाल होत असल्याने जालना जिल्ह्यातील काही इंग्रजी शाळा चालक पुढे आले असून त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे. स्वतःच्या शाळेच्या बसेस या मजुरांना घरी पोहचवण्यासाठी दिल्या आहेत. बदनापूर येथील आर. पी. इंटरनॅशनल, गोलोबल आणि पोद्दार जालना यांचा समावेश आहे. शाळेच्यावतीने ८ बसेस उपलब्ध झालेल्या असून बदनापूर चेकपोस्ट ते मंठा, बदनापूर ते सिंदखेडराजा, बदनापूर ते देऊळगावराजा या चेक पोस्टपर्यंत नेऊन सोडले जात आहे. तर जालना पोद्दारच्या वतीने नागपूरपर्यंत पायी जाणाऱ्या मजुरांना सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.