जालना - दिवाळीपूर्वी परतीच्या पावसामुळे कापसाचे भरपूर नुकसान झाले. कपाशीचे नवीन पाते गळून गेले व परतीच्या पावसात कापूसही भिजला. त्यामुळे कापूस उत्पादन अत्यल्प होणार होते. शेतकऱ्याला बाजार नियमानुसार कापसाला चांगला भाव मिळणे अपेक्षीत असताना खासगी व्यापाऱ्यांनी मात्र शेतकऱ्यांची लूटच केली. यामळे बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्र सुरू करुन हमीभावाने कापूस खरेदी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
हेही वाचा - नुकसानीची रक्कम सरकारलाच मनीऑर्डर करणार, अपुऱ्या मदतीबाबत शेतकऱ्याची उद्विग्न भावना
परतीच्या पावसाने बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकांची प्रचंड नासाडी झालेली आहे. नगदी पीक विकून ऐन दिवाळीच्या तोंडावर चांगले पैसे मिळतात म्हणून तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापूस लागवड करण्यात येते. यंदा मात्र दिवाळीच्या आधीच फुटलेला कापूस वेचण्यापूर्वीच परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे कापसाचे प्रचंड नुकसान झाले. तर वेचणीला आलेला कापूस तसाच राहिला त्यानंतर जास्त पाण्यामुळे ही झाडे काळवंडून किंवा लाल होऊन पाते गळू लागली. त्यामुळे नवीन कैऱ्या लागण्याची कोणतीही शक्यता नाही. तसेच उत्पादनातही अर्ध्यापेक्षा जास्त घट दिसून येत आहे.
परतीच्या पावसापासून बचावलेला कापूस वेचणी करताना शेतकऱ्यांना किलोमागे 10 रुपये भाव मजुरांना द्यावा लागत आहे. त्यानंतर जमा झालेला कापूस शेतकरी विक्रीसाठी नेल्यानंतर खासगी कापूस खरेदीदार ही अतिशय कमी भावात हा कापूस खरेदी करताना दिसून येत आहे. शासनाचा हमी भाव 5450 असताना सद्यस्थितीत बाजारात 4000 ते 4500 रुपये भाव शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. दिवाळीपूर्वी कापूस न निघाल्यामुळे शेतकऱ्यांनी उधार-उसणवारी करून सण साजरा केलेला असल्यामुळे ते चुकते करण्यासाठी शेतकऱ्यांना कापूस विकण्याशिवाय पर्याय नाही.
शासनाने बदनापूर येथे हमीभावाने कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. शासनाचे सीसीआय केंद्र सुरू झाल्यास शेतकऱ्यांना कापसाचा हमी भाव 5450 रुपयांने शेतकऱ्यांना कापूस विकता येणार असल्यामुळे शासनाने त्वरित हे केंद्र सुरू करून शेतकऱ्यांची अडवणूक थांबवावी, अशी मागणी प्रगतशील शेतकरी सुशील लांडे यांनी केली आहे.
हेही वाचा - कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसाचे अपहरण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल, एक अटकेत