जप्त केलेल्या 88 हजार रुपयांच्या बनावट दारूची सहा वर्षांनंतर विल्हेवाट - जालन्यात दारूची सहा वर्षांनंतर विल्हेवाट
धुळे आणि जळगाव येथून हा दारू साठा आणत असताना जालना बस स्थानक परिसरात एक वाहन पकडून सुमारे 13 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यापैकीच सुमारे 88 हजारांचा हा बनावट दारू साठा होता.
जालना - स्थानिक गुन्हे शाखेने ऑक्टोबर 2015 मध्ये बनावट दारूचा मोठा साठा जप्त केला होता. धुळे आणि जळगाव येथून हा दारू साठा आणत असताना जालना बस स्थानक परिसरात एक वाहन पकडून सुमारे 13 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यापैकीच सुमारे 88 हजारांचा हा बनावट दारू साठा होता.
तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना बनावट दारूसाठा विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बसस्थानक परिसरात त्यांनी वाहन क्रमांक एम.एच 22-6309 पकडले. त्यामध्ये बनावट दारूचे बॉक्स सापडले. पोलिसांनी शंकर त्र्यंबक सोनटक्के (रा. प्रसादनगर परभणी) दीपक किशन हाके (रा. सद्गुरुनगर, परभणी) सखाराम विठोबा चुडावकर (सहस्पूर परभणी) यांना ताब्यात घेतले होते. ही बनावट दारू तयार करण्यासाठी परभणी तालुक्यातील लिंबा या गावच्या एका शेतामध्ये व्यवस्था केली होती. त्यासाठी लागणारे स्पिरीट, लेबल, बॉटलचे झाकण आदी साहित्यही जप्त केले होते. आरोपींनी हे स्पिरीट धुळे आणि जळगाव येथून आणून मराठवाड्यात विकणार असल्याचे सांगितले.
सहा वर्ष सांभाळला साठा
2015 मध्ये ही कारवाई केल्यानंतर आरोपींची जमानत झाली आणि ज्याचे वाहन होते त्याने देखील दंड भरून वाहन सोडून घेतले. मात्र, जप्त केलेला 10 ड्रम स्पिरिट आणि भिंगरी कंपनीच्या बनावट असलेल्या देशी दारूच्या बॉटल या सदर बाजार पोलीस ठाण्यात मुद्देमाल म्हणून जपून ठेवल्या होत्या. मात्र, सहा वर्षानंतर या स्पिरीटचा धोका निर्माण झाल्याने सदर बाजार पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय देशमुख यांनी हा साठा नष्ट करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली. न्यायालयाच्या आदेशान्वये हा साठा आज शोभा प्रकाश मंगल कार्यालयाच्या परिसरात एक मोठा खड्डा खोदून त्यामध्ये नष्ट करण्यात आला. यावेळी राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी देखील उपस्थित होते. सुमारे 80 हजार रुपयांचा हा साठा होता.