जालना - नगरपालिकेच्या एका स्वच्छता निरिक्षकाने स्वखर्चाने शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी रस्त्यावर कोरोना विषाणूचे चित्र आणि बोधवाक्य लिहून जनजागृती सुरू केली आहे. विशेष म्हणजे यासाठी लागणाऱ्या रंगाचा आणि चित्रकाराचा खर्चदेखील त्यांनी स्वतः च्या खिशातून करण्याचे ठरविले आहे. अशी माहिती स्वच्छता निरीक्षक श्यामसन कसबे यांनी दिली.
नगरपालिकेच्या हद्दीत अतिक्रमणे प्रचंड वाढली आहेत. अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवण्याचे काम पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांची असते. मात्र, इच्छाशक्ती असूनही राजकीय दबावापोटी त्यांना ते करता येत नाही. परंतु खरंच इच्छाशक्ती असेल तर तो अन्य मार्गानेही समाजाबद्दलची तळमळ दाखवून देऊ शकतो. सध्या या तळमळीमधूनच कोरोना विषयाची जनजागृती करण्यासाठी शहरातील शनि मंदिर चौक, उड्डाणपूल, गांधीचमन, आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्य रस्त्यांवर विषाणू संदर्भातील चित्र आणि आणि बोधवाक्य लिहून या कोरोना आजाराची भीषणता दाखविण्याचा प्रयत्न जालना नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक श्यामसन कसबे यांनी केला आहे.