जालना - गैर बंजारा समाजाच्या नागरिकांना बंजारा जातीचे प्रमाणपत्र वितरीत केल्याचा आरोप करण्यात येत आहे. जालन्याच्या उपविभागीय कार्यालयातून जातीचे प्रमाणपत्र वितरीत केल्याचा प्रकार समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. प्रमाणपत्र घेणाऱ्या नागरिकांसह प्रमाणपत्र वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार राजेश राठोड यांनी केली आहे.
गैरबंजारा समाजाच्या नागरिकांना बंजारा समाजाच्या जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आल्याचा प्रकार जालन्यात उघडकीस आला आहे. बंजारा समाजाच्या नागरिकांकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत असून जालन्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून हे प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. विशाल मोरे, किशोर भिडे यांच्यासह आणखी दोन जणांच्या नावाने हे प्रमाणपत्र देण्यात आले असून आणखी किती जणांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
या प्रकरणी बंजारा समाजाच्या नावाने प्रमाणपत्र घेणाऱ्या नागरिकांसह प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शिवाय विधिमंडळात याप्रकरणी प्रश्न उपस्थित करणार असून दोषींवर कारवाईची मागणी करणार असल्याचे देखील राठोड यांनी म्हटल आहे. दरम्यान, बंजारा समाजातील काही कार्यकर्त्यांनी आज या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. मात्र प्रशासनातील कोणताही अधिकारी याबाबत माध्यमांशी बोलायला तयार नाही.
हे ही वाचा - ड्रग्ज प्रकरण : अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हैदराबादेत ईडी कार्यालयात हजर, पाहा व्हिडिओ