जालना - येथे मुला-मुलींच्या नावे जमा केलेले दोन लाख 88 हजार रुपये महिलेचा भाऊ आणि बँक अधिकाऱ्यांनी संगनमत करून हडप केले आहेत. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून परतूर पोलीस ठाण्यामध्ये तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- लग्नाचा पहिला वाढदिवस : रणवीर दीपिका पोहोचले तिरुपती दर्शनाला
परतूर तालुक्यातील संकनपूरी येथे राहणाऱ्या एका महिलेच्या पतीचा 2008 मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी मुला-मुलीच्या नावाने जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परतूर शाखेत खाते उघडले. त्यात मुला-मुलींच्या नावाने रक्कम जमा केली. दिनांक 27 मार्च 2019 रोजी महिला पैसे काढण्यासाठी बँकेत गेल्या. त्यावेळी त्यांच्या खात्यावर केवळ 5 हजार सहा रुपये जमा असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
बँकेत झालेले व्यवहार तपासले असता टप्प्या-टप्प्याने त्यांच्या खात्यावरुन रक्कम काढल्याची माहिती त्यांना बँकेकडून देण्यात आली. यात एकूण दोन लाख 88 हजार शंभर रुपये त्यांच्या खात्यातून काढण्यात आले आहेत. महिलेचा भाऊ भगवान दादाराव खोत याने महिलेची खोटी सही करुन बँक अधिकाऱ्यांमार्फत हे पैसे काढल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी महिलेचा भाऊ भगवान दादाराव खोत, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे परतूर शाखेचे व्यवस्थापक अशोक हरिभाऊ काउतकर आणि रोखपाल रमेश भुतेकर यांच्याविरुद्ध भारतीय फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.