जालना - जुना जालना भागातील मुक्तेश्वर महादेव मंदिर संस्थेची मोठी जागा आहे. याच जागेत निजामकालीन तलावदेखील आहे. मात्र, वर्षानुवर्ष दुरुस्तीअभावी दुर्लक्षित असलेल्या या तलावाचा जनतेला फारसा उपयोग होत नव्हता. मात्र, दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची टंचाई लक्षात घेता 'सबका साथ सबका विकास', असे म्हणत नगरसेवक अशोक पांगारकर यांच्या पुढाकारातून या तलावाला पुनर्जिवित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
'अकेला चला था, मगर कारवां बनता गया', असे म्हणत पांगारकर यांच्या साथीला प्रशासन, सामाजिक संस्था, राजकीय पुढारी आशा सर्वांनीच हातभार लावला आणि पाहता पाहता या तलावाचे रुपच बदलले. ज्या तलावांमध्ये २ कोटी लिटर पाणी साठवत होते त्या तलावाच्या खोली कारणामुळे आता तब्बल १५ कोटी लिटर पाणी साठणार आहे. या पाणीसाठासोबतच लोकांच्या सहभागातून तलावाच्या सर्व बाजूंनी सुशोभीकरणही करण्यात येणार आहे.
तलावातील पाणीसाठ्याचा फायदा या परिसरात असलेल्या ओमनगर, संजोगनगर, भाग्यनगर, शिवनगर या भागातील नागरिकांनाही होणार आहे. साडेपाच फूट पाणी साचल्यानंतर सांडव्यातून पाणी नाल्यात सोडण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्याचसोबत या तलावाच्या काठावर साडेसहाशे मीटरचा जॉगिंग ट्रॅकही तयार करण्यात आला. त्यामुळे पहाटेच्या वेळी नागरिकांना शुद्ध हवेसोबतच व्यायामासाठीदेखील हा तलाव आता मदत करणार आहे.
पहाटेच्या वेळी परिसरातील नागरिकांनी या तलावाचा दुरुपयोग सुरू केला होता. त्याला पायबंद घालण्यासाठी इथे पहाटे ४ ते ८ वाजेपर्यंत एका पहारेकऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. तलावाचा दुरूपयोग करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो काढणे, एवढेच त्याचे काम आहे. या प्रकारामुळे या तलावाच्या होणाऱ्या दुरुपयोगाला आळा बसला आहे.
जालना शहरात आतापर्यंत फक्त मोतीबाग एकच तलाव हा नागरिकांना आकर्षित करीत होता. मात्र, आता हा मुक्तेश्वर तलावदेखील नागरिकांना खुणावत आहे. तर गरज आहे ती फक्त चांगल्या पावसाची. ज्यामुळे हा तलाव भरून ओसंडून वाहू लागेल.