जालना - मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या जालना शाखेत अफरातफर झाली आहे. ग्राहकांनी ठेवलेल्या तब्बल साडे सतरा लाखांच्या मुदत ठेवी कर्मचाऱ्यांनी परस्पर हडप केल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - शरद पवार १ एप्रिलपासून उतरणार पश्चिम बंगालच्या रणांगणात
कर्मचाऱ्यांनी हडप केली रक्कम
3 मार्च 2019 ते 10 सप्टेंबर 2020दरम्यान बावणे पांगरी येथील मंजुळाबाई कोल्हे यांनी बारा लाख चोवीस हजार रुपये,त्यांच्या पतीने चार लाख 50 हजार रुपये आणि त्यांची बहीण रुक्मिणीबाई गुंजाळे यांनी 98 हजार रुपये असे सुमारे सतरा लाख 72 हजार रुपये टप्प्याटप्प्याने बँकेत मुदत ठेवी म्हणून जमा केल्या होत्या.नवीन जालनात लक्कडकोट भागात असलेल्या या बँकेच्या शाखेमध्ये ठेवी जमा केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी महिलांना बनावट पावत्या दिल्या. प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांनी ही रक्कम बँकेच्या खात्यात जमा केलीच नाही. मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतर या महिला बँकेत गेल्या असता त्यांच्या खात्यावर रक्कमच नसल्याचे उघडकीस आले आहे. मंजुळाबाई कोल्हे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेचे कर्मचारी सतीश देशमुख, चव्हाण, आणि राठोड या तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा - पुण्यातील कोरोना आटोक्यात येईना; खासगी प्रयोगशाळा महापालिकेच्या रडारवर..!
वादग्रस्त बँक
बँकेतील व्यवहारासंदर्भात रिझर्व्ह बँकेने आक्षेप घेऊन या बँकेचे सर्व व्यवहार काही दिवसांसाठी बंद केले आहेत. सुमारे चार महिन्यांपूर्वी या बँकेवर निर्बंध लादून कोणताही व्यवहार करण्यास मनाई केली आहे. त्यातच आता मुदत ठेवीचे हे प्रकरण उघडकीस आल्याने बँक व्यवस्थापन चांगलेच अडचणीत आले आहे .