जालना - मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांवर झालेल्या आरोपानंतर, भाजपाने गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत रविवारी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने केली. दरम्यान भाजपाच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देताना माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. देशमुख यांच्याविरोधातील भाजपाचे आंदोलन म्हणजे नौटंकी असल्याची टीका त्यांनी केली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सध्या आरोपांचा भडीमार केला जात आहे. त्यातच भारतीय जनता पार्टीने हे प्रकरण उचलून धरत ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत. या पार्श्वभूमीवर खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेहमीच सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र ते कधीही शक्य होत नाही. सध्या राज्यात अनिल देशमुख यांच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन म्हणजे भाजपाची नौटंकी आहे, भाजप नौटंकी करण्यात पटाईत आहे. ही नौटंकी करत असताना त्यांनी कायदा हातात घेतला. परंतु कायदा देखील आपले काम चोखपणे बजावत आहे. म्हणूनच काल आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यामुळे कोणी कायदा हात घेण्याचा प्रयत्न करू नये, अंस यावेळी खोतकर यांनी म्हटले आहे.
भाजप आंदोलकांवर गुन्हे दाखल
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काल दिनांक 21 रोजी जालन्यात आंदोलन करून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या आंदोलनामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन झाले, त्यामुळे पोलिसांनी आंदोलनात सहभागी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.