जालना- यात्रेसाठी जालना तालुक्यातील चाळीस जण नेपाळला गेले होते. मात्र, त्यांना अर्धवट यात्रा सोडून परत यावे लागले आहे. शुक्रवारी रात्री जालन्यात ते परत आले. शनिवारी आरोग्य विभागाने शिरसवाडी येथे जाऊन त्यांना होम क्वारन्टाईन केले आहे.
हेही वाचा- कोरोना परिणाम : दुकाने, मॉल बंद झाल्याने ऑनलाईन खरेदीचे वाढले प्रमाण
जालना तालुक्यातील सिरसवाडी गावातून 30, खरपुडीतून 3, हिवरा रोषणगावातून 3, इंदेवाडी 2, आणि जालना शहरातून 2 असे एकून 40 जण रेल्वेने नेपाळला यात्रेसाठी गेले होते. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे शेवटचे दोन दिवस त्यांना यात्रा आटोपती घ्यावी लागली. तेथील प्रशासनाने त्यांना परत पाठवले आहे. हे सर्वजण शुक्रवारी रात्री जालना शहरात पोहचले.
यात्रेकरूंची त्याच दिवशी तपासणी न करता आज शनिवारी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य सहाय्यक डी. एम. वाघमारे आणि आरोग्य सेवक आर. ए. बनकर यांनी ही तपासणी केली. पुढील 14 दिवस आशा स्वयंसेविका, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, यांच्या माध्यमातून त्यांची दैनंदिन तपासणी केली जाणार आहे. तसेच होम क्वारन्टाईनचे शिक्केही त्यांच्या हातावर मारण्यात आले आहेत. गावच्या सरपंच कालींदा कैलास ढगे यादेखील यात्रेकरूंना आणि ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.