जालना - कोरोनाचे संकट आणि टाळेबंदी असताना नागरिकांना शिस्तपालन करायला लावताना पोलिसांची दमछाक होते. अशा स्थितीत पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी शहरातील २० विद्यार्थी पोलीस मित्र म्हणून स्वेच्छेने काम करत आहेत.
शहरातील विद्यार्थ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे विनंती करून स्वेच्छेने पोलीस मित्र म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याला अनुसरून पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी विद्यार्थ्यांना पोलीस मित्र म्हणून सेवा देण्यासाठी परवानगी दिलेली आहे.
हेही वाचा-कोरोनाचा परिणाम : सेवा क्षेत्रातील कर्मचारी भविष्यातही करणार घरातून काम
पोलीस मित्रांना प्रशिक्षण-
टाळेबंदीत आवश्यक असणारे प्राथमिक प्रशिक्षणही विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. संशयित रुग्णांसोबत कसे वागावे, शहरात वाहतुकीची व्यवस्था कशी करावी याविषयी पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे विद्यार्थी पोलीस प्रशासनाने नेमून दिलेल्या ठिकाणी सेवा देणार आहेत. या सेवेच्याबदल्यात कोणतेही आर्थिक फायदे नसले तरी सेवा पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाच्यावतीने त्यांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी आणि देशसेवा करण्याचे समाधान मिळेल म्हणून काम करत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. टाळेबंदी संपेपर्यंत दररोज हे सर्व विद्यार्थी पोलीस मित्र म्हणून जबाबदारी पार पडणार आहेत.
हेही वाचा-कोरोना लढा : अतिश्रीमंतावर ४० टक्के कर लागू करा, महसूल अधिकाऱ्यांची सरकारला शिफारस