जळगाव - पाण्याने भरलेल्या टाकीत बुडून एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. ही घटना मोहाडी येथे घडली. शंकर तुकाराम सपकाळे (वय ३२, मोहाडी, ता. जळगाव) असे मृताचे नाव आहे. टाकीची सफाई करताना पायात वायर अडकून तो पाण्याच्या टाकीत पडला. पट्टीचा पोहणारा असतानादेखील धडपड करुनही त्याला जीव वाचवता आला नाही. पायात अडकलेल्या वायरीमुळे शंकरचा जीव गेला.
शिरसोली रस्त्यावरील अनुभूती शाळेच्या आवारात डव्हाईन पार्कमधील तलावात शंकर हा साफसफाईचे काम करत असे. दरम्यान, आज सकाळी साडेदहाच्या सुमारास तो तलाव सफाईचे काम करत होता. या तलावातून अंडरग्राउंड इलेक्ट्रिक सप्लायची वायर गेली आहे. सफाईचे काम करत असताना शंकरचा पाय या वायरमध्ये अडकला आणि त्याचा तोल गेला. यात तो तलावाच्या पाण्यात पडला. विशेष म्हणजे शंकर हा पट्टीचा पोहणारा होता. मात्र, त्याच्या पायात वायर अडकलेली असल्याने त्याला पोहता आले नाही. परिणामी त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याला तत्काळ जिल्हा रूग्णालयात आणले मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
शंकर सपकाळे याचा मृत्यू झाल्याची बातमी गावात आणि घरच्यांना समजताच, घरच्यांनी तत्काळ रूग्णालय गाठले. शंकरचे दोन्ही मोठे भाऊ हे जैन कंपनीत कामाला आहेत. शंकरच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.