भुसावळ (जळगाव) - शहरातील बाबला हॉटेल परिसरातील रहिवासी 21 वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना खडका रोडवरील निर्माणाधीन उड्डाणपुलाखाली रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. अल्तमश शेख (२१) रशीद असे मृताचे नाव आहे. यामुळे भुसावळ शहरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या महिनाभरात भुसावळ शहरात ही खुनाची दुसरी घटना आहे.
मृतावर अज्ञात संशयितांनी चाकूने चार ते पाच वार केले. यानंतर त्याला त्याच्या मित्राने शहरातील मानवतकर हॉस्पिटलमध्ये आणले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. यानंतर घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) गजानन राठोड यांनी सहकाऱ्यांसोबत घटनास्थळ गाठले. तर काही पोलीस अधिकारी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. या घटनेमागील कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी तत्काळ या घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस घटनेची चौकशी करत होते.
गेल्या महिन्यातही घटली होती अशीच घटना -
दरम्यान, 25 ऑगस्टला श्रीरामनगरानगरात एका तरुणाचा घरात घुसून त्याच्यावर गोळीबार करून खून केल्याची घटना घडली होती. त्यामुळे भुसावळातील ही घटना ताजी असताना पुन्हा एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.