जळगाव - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अखत्यारीत येणाऱ्या 'राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण' तर्फे जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदीकरणाचे काम सुरू आहे. हे काम अतिशय संथगतीने व निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप शिवसेनेचे पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी केला आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी त्यांनी आज (रविवारी) दुपारी महामार्गावर पारोळा येथे रास्ता रोको आंदोलन करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
वर्षानुवर्षे रखडले आहे महामार्गाचे काम -
जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या फागणे (ता. धुळे) ते तरसोद (ता. जळगाव) या टप्प्याचे चौपदीकरण गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आमदार चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले -
महामार्गाचे रखडलेले चौपदीकरण, रस्त्यावरील खड्डे, चुकीच्या पद्धतीने केलेले खोदकाम अशा कारणांवरून आमदार चिमणराव पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेकांना जीव गमवावा लागला असून, अनेक जण जायबंदी झाले आहेत. त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी केली.
अन्यथा अधिकाऱ्यांना काळे फासू -
महामार्गाच्या फागणे ते जळगाव टप्प्याचे चौपदीकरणाचे काम लवकर पूर्ण झाले नाही, तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना काळे फासू, अशा इशारा यावेळी आंदोलकांच्या वतीने देण्यात आला. काम लवकर पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
गडकरींच्या विभागावर आमदारांची आगपाखड -
यावेळी आंदोलनाची भूमिका मांडताना आमदार चिमणराव पाटील म्हणाले की, महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अखत्यारीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून चांगल्या पद्धतीने काम होणे अपेक्षित आहे. मात्र, नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. याच महामार्गाचे तरसोद ते चिखली या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. मग याच टप्प्याचे काम का रखडले आहे? याकडे लक्ष द्यायला हवे. आता हे काम लवकर पूर्ण झाले नाही तर यापुढे काम होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.