जळगाव - विवाह जुळवणीसाठी असलेल्या सोशल साईटवरून मैत्री करत अहमदनगरच्या तरुणाने मुलीला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याची घटना घडली आहे. संबंधित पीडिता गर्भवती राहिल्यानंतर त्याने लग्नास नकार देत पळ काढला होता. या प्रकरणी ११ सप्टेंबर २०१९ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
हेही वाचा - औषधाने मुले होत असल्याचे सांगून 3 लाखांचा गंडा ; बोगस डॉक्टरसह तीनजण अटकेत
गुन्ह्यात पोलिसांनी संशयित तरुणास बुधवारी अटक केली. सचिन रावसाहेब इंगळे (वय २८, रा. शेवगाव, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. सचिन याने सन २०१५ मध्ये विवाह जुळवणीसाठी असलेल्या एका सोशल साईटवरून पीडितेशी मैत्री केली. ती जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात राहणारी होती. मैत्री झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना फोन नंबर दिले होते. त्यावरून सुमारे एक महिना दोघे एकमेकांशी बोलत होते. याच दरम्यान, आरोपीने जळगावात येऊन एका हॉटेलमध्ये पीडितेवर अत्याचार केला होता. यानंतर शेवगाव येथे घरी घेऊन जात लग्नाचे आमीष दाखवले होते. पीडितेला विश्वासात घेतल्यानंतर त्याने काही वर्षे तिच्या संपर्कात राहून शरीरसंबंध ठेवले. यानंतर एप्रिल २०१९ मध्ये त्याने शहरातील अयोध्यानगर भागात भाड्याने खोली घेतली होती, तेथे दोघे एकत्र राहत होते. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर आरोपी फरार झाला.
बेकायदेशीरपणे केला गर्भपात -
पीडिता गर्भवती राहिल्यानंतर सचिनने तिच्या गळ्यात बनावट मंगळसूत्र घालून तिला शहरातील एका रुग्णालयात नेले. या रुग्णालयात त्याने बेकायदेशीरपणे तिला गर्भपात करण्याच्या गोळ्या दिल्या. गर्भपात झाल्यानंतर पीडितेची प्रकृती खराब झाली होती. तिला रुग्णालयात दाखल करून आरोपी गावी निघून गेला.
अखेर ११ सप्टेंबर २०१९ रोजी पूजाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सचिन विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी पोलिसांनी शेवगाव येथून आरोपीला अटक केली आहे.
हेही वाचा - पुणे-सोलापूर महामार्गावर चारचाकीची दुचाकीला धडक, तीन जण जागीच ठार