जळगाव - भुसावळ तालुक्यातील तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शुक्रवारी मध्यरात्रीनंतर हतनूर धरणाचे 24 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. सध्या तापी नदीपात्रात हतनूर धरणातून 888.00 क्यूमेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हतनूर धरणाचे कार्यकारी अभियंता एन. पी. महाजन यांनी ही माहिती दिली.
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 12.28 मिलीमीटर पाऊस पडला आहे. याशिवाय पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने पूर्णा नदीच्या पाणीपातळीत 44 सेंटीमीटरने वाढ झाली आहे. त्यामुळे हतनूर धरणाच्या पाणीपातळीत शुक्रवारी मध्यरात्री तब्बल 5 सेंटीमीटरची वाढ नोंदवण्यात आली होती. त्यामुळे आधी अर्धा मीटरने उघडण्यात आलेल्या 14 दरवाजांसह अजून 10 दरवाजे उघडण्यात आले. सद्यस्थितीत धरणाचे एकूण 24 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून, तापी नदीपात्रात 888.00 क्यूमेक म्हणजेच 31 हजार 364 क्यूसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
तापी पाटबंधारे विभागाच्या वतीने 15 ऑगस्टपर्यंत हतनूर धरणाची पाणीपातळी 209.500 या लेव्हलपर्यंत कायम नियंत्रित ठेवली जाते. आजरोजी धरणात 181.60 एमएमक्यूब एवढा पाणीसाठा आहे. दरम्यान, हतनूर धरणातून तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने नदीकाठावरील गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन तापी पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.