जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण अतिशय संथगतीने सुरू आहे. गेल्या 6 महिन्यात फक्त पावणे नऊ लाख जणांचे लसीकरण होऊ शकले आहे. त्यात 6 लाख 90 हजार 657 जणांनी कोरोना लसीचा पहिला तर 1 लाख 83 हजार 689 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सुमारे 45 लाखांच्या घरात आहे. त्यामुळे लसीकरणाची गती अशीच सुरू राहिली तर संपूर्ण जिल्ह्याचे लसीकरण व्हायला काही वर्षे लागतील, अशी स्थिती आहे. राज्य व केंद्र सरकारने लसींचा पुरवठा सुरळीत करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दुसऱ्या डोससाठी करावी लागते प्रतीक्षा
जिल्ह्यात आवश्यकतेनुसार लसींचा साठा उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाच्या प्रक्रियेवर परिणाम होत आहे. पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी नागरिकांना लांबवर प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यात 16 जानेवारी 2021 पासून लसीकरणाला प्रारंभ झाला. त्यानंतर आतापर्यंत 6 लाख 90 हजार 657 जणांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या अवघी 1 लाख 83 हजार 689 इतकीच आहे. ही टक्केवारी निम्मेही नसल्याने कोरोना विरुद्धचा लढा कसा यशस्वी होईल? हा खरा प्रश्न आहे.
ज्येष्ठांची लसीकरणात आघाडी
जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक लसीकरण हे ज्येष्ठ नागरिकांचे झाले आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील 2 लाख 88 हजार 137 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यात 2 लाख 12 हजार 627 जणांनी पहिला तर 75 हजार 510 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक फटका बसला. ही परिस्थिती लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिक स्वेच्छेने लसीकरणासाठी पुढे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
प्रौढ नागरिकांचा लसीकरणाला प्रतिसाद, मात्र तरुणांची आकडेवारी चिंताजनक
ज्येष्ठ नागरिकांपाठोपाठ प्रौढ नागरिकांचा देखील लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील 45 ते 60 वयोगटातील 2 लाख 80 हजार 657 नागरिकांचे आतापर्यंत लसीकरण झाले आहे. त्यात 2 लाख 29 हजार 112 जणांनी लसीचा पहिला तर 51 हजार 545 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. दुसरीकडे, तरुणांच्या लसीकरणाची आकडेवारी मात्र, फारशी समाधानकारक नाही. जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील 1 लाख 69 हजार 020 जणांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी 1 लाख 55 हजार 739 जणांनी पहिला तर फक्त 13 हजार 281 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात तरुणांचे सर्वाधिक बळी गेले. तरी देखील लसीकरणाला गती येत नसल्याची चिंताजनक परिस्थिती आहे. मध्यंतरी राज्य सरकारने कोरोना लसींचा तुटवडा असल्याने 18 ते 44 वयोगटातील लसीकरण बंद केले होते. त्याचाही परिणाम या वयोगटातील लसीकरणावर झाला आहे.
50 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळालीय लस
जिल्ह्यातील 50 हजार 172 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. त्यातील 30 हजार 295 जणांनी पहिला तर 19 हजार 878 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. त्याचप्रमाणे, 86 हजार 360 फ्रंटलाईन वर्कर्सनी लस घेतली आहे. त्यात 62 हजार 884 जणांनी पहिला व 23 हजार 476 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स मिळून जवळपास 1 लाख 36 हजार जणांचे लसीकरण झाले आहे.
नागरिकांचा प्रतिसाद कायम, पण लसींची उपलब्धता कमी
जळगाव जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सला प्राधान्य होते. त्यानंतर राज्य सरकारच्या निर्देशानुसार 18 वयोगटापासून पुढे लसीकरण सुरू झाले. तेव्हा नागरिक लस घ्यायला घाबरत होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट अतिशय तीव्र होती. त्यात लसीकरणाचे महत्त्व सर्वांना कळाले. नंतर लसीकरणाला प्रतिसाद मिळू लागला. पण लसींचा आवश्यक तेवढा साठा उपलब्ध होत नसल्याने लसीकरण रखडत सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर लस उपलब्ध नसते. ज्या केंद्रांवर लस उपलब्ध झाली, ती लगेच संपते. अशा परिस्थितीत नागरिकांना ताटकळत रहावे लागत आहे. राज्य व केंद्र सरकारने लस उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी मागणी होत आहे.
लसींची उपलब्धता कमी असल्याने अडचणी
लसीकरणाच्या प्रक्रियेबाबत माहिती देताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी सांगितले की, राज्य सरकारकडून जिल्ह्यासाठी लसींचा जेवढा साठा उपलब्ध होतो, तेवढा साठा लगेचच जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर पाठवला जातो. राज्य सरकारने लस वेळेवर उपलब्ध करून दिली तर जिल्ह्यात लवकर लसीकरण होऊ शकते. आपल्या प्रत्येक केंद्रांवर सुसज्ज व्यवस्था आहे. मात्र, लसींचा मागणीच्या तुलनेत पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने अडचणी येतात, असे डॉ. चव्हाण म्हणाले.