जळगाव - केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर आजपासून (1 मे) 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कोरोनाचे लसीकरण सुरू झाले आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यात लसींचा मर्यादित पुरवठा झाल्याने अवघ्या 5 केंद्रांवर प्रातिनिधिक स्वरुपात लसीकरण होणार आहे. जिल्ह्यासाठी काल (शुक्रवारी) लसीचे साडेसात हजार डोस मिळाले आहेत. त्यानुसार प्रत्येक केंद्रावर सव्वाशे ते दीडशे नागरिकांना लस दिली जाणार आहे. दरम्यान, लसीचे डोस वेळेवर उपलब्ध न झाल्याने दुपारी 1 वाजेपर्यंत लसीकरणाला सुरुवात झाली नव्हती.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यात शनिवारपासून या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली. जळगाव जिल्ह्यासाठी या टप्प्यांतर्गत सात दिवसात साडेसात हजार डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी केवळ जळगाव शहरातील पाच शासकीय केंद्रांवर लसीकरण होणार आहे.
या केंद्रांवर होणार लसीकरण-
जळगाव जिल्ह्यासाठी कोरोना लसीचा पुरवठा मर्यादित स्वरूपात झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने प्रातिनिधिक स्वरूपात केवळ जळगावातील पाच शासकीय केंद्रांवर लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस मिळू शकणार नाही. जळगावातील शिवाजीनगरातील डी. बी. जैन रुग्णालय, शाहू महाराज रुग्णालय, सिंधी कॉलनीतील नानीबाई रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या माध्यमातून सुरू असलेले रेडक्रॉस सोसायटी व रोटरी भवन येथील लसीकरण केंद्रांवर या वयोगटासाठी लसीकरण होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.
45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण नियमित सुरू राहणार
जळगाव जिल्ह्यात 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचे देखील डॉ. नागोराव चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यातील 133 केंद्रांवर ही लसीकरणाची प्रक्रिया सुरू राहील. त्यासाठी दोन दिवसांपूर्वीच लसीचे 15 हजार डोस प्राप्त झाले आहेत. शुक्रवारपासून रखडलेले लसीकरण पुन्हा सुरू झाले आहे. परंतु, या पुढच्या काळात पुरेसे डोस मिळाले नाही तर मात्र, ही प्रक्रिया पुन्हा बंद पडेल, अशी स्थिती आहे.
पहिल्याच दिवशीच नियोजनाचा फज्जा
18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठीच्या लसीकरणाला महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रारंभ केला जाणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. मात्र, योग्य ते नियोजन न झाल्याने नागरिकांना सकाळपासून लस मिळू शकली नाही. दुपारी एक वाजेपर्यंत लसीचे डोस लसीकरण केंद्रांवर पोहोचलेले नव्हते. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. अनेक नागरिक सकाळी लसीकरण केंद्रावर पोहोचले. परंतु, लसीचे डोस आलेले नसल्याने ते माघारी फिरले.
हेही वाचा - संतापजनक! धुळ्यात कोरोना रुग्णाला बेड मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी?