जळगाव - रस्त्याने चालण्या-फिरण्यासाठी अंध व्यक्तींना कुणाची तरी मदत घ्यावी लागते. अंध व्यक्तींची ही अडचण आता काही प्रमाणात दूर होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी अंध व्यक्तींना मदत करणारा तिसरा डोळा शोधून काढला आहे. 'गॅझेट' नावाच्या एका उपकरणाची त्यांनी निर्मिती केली आहे. या उपकरणाच्या माध्यमातून अंधांना रस्त्यावरील अडथळ्यांची माहिती मिळणार आहे. त्यामुळे ते कोणाच्याही मदतीविना सहज चालू-फिरू शकणार आहेत.
'द थर्ड आय फॉर द ब्लाइंड पीपल' अधारित प्रकल्प'
भुसावळच्या हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम शाखेतील अंतिम वर्षाच्या कोमल जाधव, धनश्री बऱ्हाटे, राजश्री बडगुजर या विद्यार्थिनींनी 'द थर्ड आय फॉर द ब्लाइंड पीपल' या संकल्पनेवर आधारित गॅझेट उपकरणाची निर्मिती केली आहे. या कामासाठी त्यांना प्रा. धीरज पाटील यांनी मार्गदर्शन केले.
'अर्डिनो प्रणालीवर आधारित आहे उपकरण'
एखाद्या ठिकाणी जायचे असेल तर रस्त्याने जाताना अंध व्यक्तींना अनेक अडचणी भेडसावत असतात. प्रत्येक वेळी रस्ता सांगणाऱ्या व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास ठेवूनच पुढे जावे लागते. मात्र, आता अर्डिनो प्रणालीने रस्त्यातील अडथळ्यांची माहिती देणारे गॅझेट्स अंध व्यक्तींची मदत करणार आहे. दृष्टिबाधित लोकांना वेगाने चालत जाता यावे. अल्ट्रासोनिक लाटांच्या मदतीने जवळपासच्या अडथळ्यांना जाणून घेण्यास मदत होईल, असा या उपकरणाच्या निर्मिती मागचा उद्देश आहे. इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून अर्डिनो युनो, अडथळे शोधण्यासाठी एचसी एसआर 04 अल्ट्रासोनिक सेन्सर, डीसी मोटर, बझर, रेड एलईडी, स्विचेस, पॉवर बँक, हेडर पिन यासारख्या उपकरणांच्या मदतीने ही प्रणाली काम करणार आहे. उपकरणाच्या डिझाईनसाठी कमी वेळ लागला व त्याचा उत्पादन खर्चही कमी आहे. अवघ्या दोन ते अडीच हजारात हे उपकरण बनवले आहे. कमी वीज वापरासह हलके वजन असल्याने, अंध व्यक्ती हे यंत्र कुठेही सहज नेऊ शकतील, असे उपकरण बनवणाऱ्या विद्यार्थिनींनी सांगितले.
'कसे काम करते हे यंत्र'
ही प्रणाली वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना ओळखून (ध्वनिलहरी) लाटा तयार करते. समोर अडथळा आला की उपकरणात आवाज निर्माण होतो. त्यामुळे समोर अडथळा आहे, असे लगेच लक्षात येते. हे उपकरण दृष्टिहीन लोकांना अडथळे ओळखून आरामात चालण्यास मदत करेल. त्यांना फक्त हे डिव्हाइस आपल्या हातावर, पायावर किंवा डोक्यावर लावावे लागणार आहे. सध्या या प्रणालीच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात येणार आहे. लवकरच काही बदल करून, ती बाजारात आणण्याचा प्रयत्न आहे, असे मार्गदर्शक प्रा. धीरज पाटील यांनी सांगितले.
'उपकरणात लवकरच गुगल मॅपचा वापर'
या उपकरणात समोर अडथळा आला की बजर वाजतो. या माध्यमातून संबंधित व्यक्ती अलर्ट होते. अंध व्यक्तींना दिसत नाही. जात असलेल्या ठिकाणी जाता यावे. तसेच, शॉर्टकट मार्ग कोणता, मार्गावरील वळणे यांची माहिती मिळावी म्हणून गुगल मॅपचा वापर करत हे उपकरण अत्याधुनिक बनवले जाणार आहे. अंध व्यक्तीला एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने उपकरणात इच्छित स्थळाचा प्रोग्राम फीड केला की हे उपकरण त्याचे काम करेल. लवकरच त्याची निर्मिती होईल, असा मानस विद्यार्थिनींनी व्यक्त केला आहे.