जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी व्हायची चिन्हे दिसत नाहीये. मंगळवारी पुन्हा 3 कोरोना बाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 60 वर पोहचला आहे. मंगळवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये 2 रुग्ण हे पाचोऱ्यातील तर एक भुसावळातील आहे.
पाचोरा व पारोळा येथे स्वॅब घेतलेल्या 14 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आज जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. यापैकी 12 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर 2 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या दोन्ही व्यक्ती या पाचोरा शहरातील असून ते 30 व 36 वर्षीय पुरूष आहेत. तिसरी पॉझिटिव्ह महिला ही भुसावळातील 58 वर्षीय आहे. निगेटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये 10 व्यक्ती पाचोरा येथील तर 2 व्यक्ती पारोळा येथील आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 60 इतकी झाली आहे. त्यापैकी 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील अमळनेर, पाचोरा, जळगाव आणि भुसावळात कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कातील संशयितांना क्वारंटाईन करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यातील हायरिस्कमधील संशयितांचे नमुने तातडीने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत.