जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच आहे. सोमवारी जळगावात पुन्हा 4 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण 176 वर पोहचली आहे.
जळगाव जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या 22 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल सोमवारी रात्री प्राप्त झाले आहेत. यापैकी 18 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 4 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या चारही व्यक्ती या जळगाव शहरातील आहेत. यामध्ये मारुतीपेठ, जळगाव येथील 49 वर्षीय महिला, ओंकारनगर येथील 79 वर्षीय पुरुष, प्रतापनगर येथील 32 वर्षीय महिला तर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथील 23 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.
सोमवारी 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू-
सोमवारी जळगाव जिल्ह्यात 3 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जळगाव येथील एक 50 वर्षीय पुरुष व एक 55 वर्षीय महिलेचा तर चोपडा येथील एका 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 176 इतकी झाली असून त्यापैकी 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 23 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.