जळगाव - येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी ऑन ड्युटी ओली पार्टी केल्याचे उघड झाले होते. या प्रकारानंतर पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार शाखा अभियंता आर. आर. ठाकूर आणि अनुरेखक हरचंद खंडू हजबन यांना निलंबित करण्यात आले आहे. तर करार पद्धतीवर सेवेत असलेल्या सेवानिवृत्त उपअभियंता टी. एस. गाजरे यांचा करार रद्द करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीअंती शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. 'ईटीव्ही भारत'ने हे प्रकरण सर्वात प्रथम चव्हाट्यावर आणले होते. त्यामुळे या प्रकरणात कारवाई झाली आहे.
जळगाव येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यालयात तीन जण कार्यालयीन वेळेत मद्यप्राशन करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. या व्हायरल व्हिडिओची दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार शुक्रवारी सकाळी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात आली. त्यात ऑन ड्युटी मद्यप्राशन करणारी व्यक्ती ही शाखा अभियंता आर. आर. ठाकूर असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यासोबत अनुरेखक हरचंद खंडू हजबन आणि करार पद्धतीवर सेवेत असलेले सेवानिवृत्त उपअभियंता टी. एस. गाजरे हे देखील मद्यप्राशन करत असल्याचे स्पष्ट झाले होते.
निलंबन कालावधीत हजेरी बंधनकारक -
या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत शाखा अभियंत्यासह अनुरेखक आणि करार पद्धतीवर असलेले उपअभियंता दोषी असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नाशिक कार्यालयातील प्रमुख प्रशांत भामरे यांनी निर्देश जारी करत शाखा अभियंता आर. आर. ठाकूर व अनुरेखक हरचंद खंडू हजबन यांना निलंबित करण्याचे आदेश काढले. निलंबनाच्या काळात ठाकूर यांना मजिप्रा उपविभाग कार्यालय नंदुरबार येथे हजेरी लावण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. तर हजबन यांना एरंडोल येथे हजेरी लावण्याचे बंधनकारक केले आहे.
सेवानिवृत्त उपअभियंत्याचा करार रद्द -
या प्रकरणात शाखा अभियंता ठाकूर आणि अनुरेखक हजबन यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली तर करार पद्धतीवर सेवेत असलेले सेवानिवृत्त उपअभियंता टी. एस. गाजरे यांचा करार रद्द करण्यात आला आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.