जळगाव - कृषी व्यवसायासाठी कमी व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून एका शेतकऱ्यास तब्बल १९ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी, मुंबई येथून तीन जणांना अटक केली असून ४ लाख ९० हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. अली मोहम्मद मुमताज, अविनाश हनुमंत वांगडे आणि रविराज शंकर डांगे अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे, प्रकरणात यापूर्वी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात दिल्ली येथील सतींदरसिंग तारलोकसिंग व दीपक सत्यप्रकाश गुप्ता या दोन आरोपींनी अटक झाली होती.
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील शेतकरी संदीप विठ्ठल महाजन यांना दुग्धव्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी त्यांनी जानेवारीमध्ये पाचोरा येथील एका बँकेशी संपर्क साधून ७५ लाख रुपये कर्ज हवे असल्याचे सांगितले. मात्र, बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने इतकी रक्कम मिळणार नसल्याचे सांगितले होते. या दरम्यान, महाजन यांना मुंबई येथून कथित बजाज फायनान्सच्या कार्यालयातून व्यवस्थापक कबीर अग्रवाल (बनावट नाव) बोलत असल्याचे सांगून एकाने मोबाईलवर संपर्क साधला. तुम्हाला कर्ज मिळेल. मात्र, त्याबदल्यात ४ लाखाची विमा पॉलिसी काढावी लागेल. या पॉलिसीचे सर्व फायदे मिळतील तसेच ४० लाखापर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळू शकते, असे आमिष त्याने दिले. महाजन यांनी आमिषाला बळी पडत पॉलिसी काढली. या दरम्यान भामट्याने वेळोवेळी त्यांच्याकडून विमा पॉलिसीच्या नावाने विविध बँक खात्यांवर रोख रक्कम मागवून घेतली. तसेच एकदा मुंबई येथे बोलावून रोख ६ लाख रुपये घेतले. अशा पद्धतीने त्याने महाजन यांच्याकडून १८ लाख ४९ हजार रुपये घेतले. यानंतरही महाजन यांना कर्ज मिळाले नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर विभागात फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.
तपासादरम्यान, सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी फेब्रुवारीमध्ये सापळा रचून दोन आरोपींना अटक केली होती. यावेळी या दोघांनी गुन्ह्याची कबुलीही दिली होती. मात्र, त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे या गुन्ह्यातील इतर भामट्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक बाहेरगावी जाऊ शकले नव्हते. यानंतर आता पुन्हा एकदा पोलिसांच्या पथकाने मुंबई गाठून उर्वरित तीन भामट्यांना अटक केली. सोमवारी त्यांना जळगावात आणण्यात आले. या संशयितांकडून चार एटीएम कार्ड व ४ लाख ९० हजार रुपये जप्त करण्यात आले आहे.