जळगाव - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच अफवांचेही पेव फुटले आहे. अफवांमुळे काही ठिकाणी तर भलतेच प्रकार घडत आहेत. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात असलेल्या वसंतनगर येथे असाच काहीसा प्रकार घडला आहे. कोरोनाच्या भीतीपोटी अज्ञात व्यक्तीने सुमारे दोन ते अडीच हजार कोंबड्या चक्क गायरानात सोडून दिल्या आहेत. वाढत्या उन्हामुळे त्यातील निम्म्याहून अधिक कोंबड्या मृत पावल्या आहेत. या प्रकारामुळे रोगराई पसरण्याची भीती असल्याने ग्रामस्थांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात खळबळ माजली आहे. चिकन खाल्ल्यामुळे कोरोनाची लागण होते, असा गैरसमज पसरल्यामुळे अनेकांनी चिकन खाणे बंद केले आहे. अशा अफवेमुळे पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला आहे. चिकनला मागणी नसल्याने पोल्ट्रीत हजारो कोंबड्या पडून आहेत. पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आल्याने काही जण कवडीमोल दरात जिवंत कोंबड्या विकत आहेत, तर काही जण चक्क जिवंत कोंबड्या सोडून देत आहेत. अशाच प्रकारातून वसंतनगर येथील गायरानात अज्ञात पोल्ट्री चालकाने दोन ते अडीच हजार कोंबड्या सोडून दिल्या आहेत. वाढत्या उन्हामुळे त्यातील निम्म्याहून अधिक कोंबड्या मृत पावल्या आहेत. काही कोंबड्यांचा जंगली श्वापदे, कुत्र्यांनी फडशा पाडला आहे. ही घटना समोर आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर वसंतनगरचे सरपंच अविनाश जाधव, पोलीस पाटील जाधव यांनी पारोळा पोलिसांकडे तक्रार केली आहे. हा प्रकार करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.