जळगाव - शहरात एका 4 वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या चिमुकलीला पाण्यात बुडवून मारल्याचा संशय व्यक्त होत आहे. पिंप्राळा हुडको येथे दुपारी अडीच वाजता ही घटना उघडकीस आली. आरशीन साबीर शहा (वय 4, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव), असे मृत बालिकेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका 14 वर्षीय मुलीस चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पिंप्राळा हुडको परिसरातील 'ए' इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर खोली क्रमांक 59 मध्ये साबीर शहा राहतात. सकाळी 10 वाजता शहा यांच्या पत्नी रिजवाना यांनी मुलगी आरशीन हिची अंघोळ घालून तिला घराबाहेर उभे केले होते. त्या मुलीसाठी पावडर, तेल, कंगवा आणण्यासाठी घरात गेल्या. तर आरशीनचे वडील साबीर शहा हे इमारतीच्या खाली असलेल्या दुकानात साहित्य आणण्यासाठी गेले होते. अवघ्या दोन मिनिटांत आरशीन घराबाहेरुन बेपत्ता झाली. यामुळे रिजवाना व साबीर यांनी तिचा शोध सुरू केला. 2 तास उलटले तरी देखील आरशीन मिळून आली नव्हती. या दाम्पत्याने शेजारच्या इमातींमध्ये जाऊन देखील शोध घेतला. परिसरातील नागरिक देखील आरशीनचा शोध घेत होते. त्यांनी हुडको परिसर पिंजून काढला. पण, आरशीन मिळून आली नाही. यानंतर दुपारी अडीच वाजता शेजारी राहणाऱ्या एका 14 वर्षीय मुलीस आरशीनचा मृतदेह तिच्याच घराशेजारच्या जिन्यावर आढळून आला.
आरशीनचा शोध घेत या जिन्यावरुन शेकडो लोकांनी 4 तासात ये-जा केली होती. तेव्हा जिन्यात कोणीच नव्हते. मात्र, या 14 वर्षीय मुलीस 4 तासानंतर आरशीनचा मृतदेह आढळला. तिने हा मृतदेह उचलून शेजारी राहणाऱ्या अनिता भोई यांच्या घरात नेला. भोई कुटुंबीय देखील भांबावले होते. त्यांनी बाहेर येऊन आरडा-ओरडा केल्यानंतर 14 वर्षीय मुलगी पुन्हा हा मृतदेह जिन्यात ठेऊन निघून गेली. यानंतर हुडको परिसरात एकच खळबळ उडाली.
आरशीनचा मृतदेह ओला होता. तिला पाण्यात बुडवून मारल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. शेजारी राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीवर त्यांनी संशय व्यक्त केल्यामुळे पोलिसांनी या मुलीस चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली.
हेही वाचा - जळगाव महापालिका महासभा: सरदार पटेलांच्या पुतळ्यावरुन भाजप-सेनेत वादंग