जळगाव - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उद्या (मंगळवारी) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. माजीमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून जामनेर येथे साकारलेल्या ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण तसेच जीएम डायग्नोसिस सेंटरचे व्हर्च्युअल उदघाटन अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने फडणवीस जळगाव दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात फडणवीस आणि खडसे यांची भेट होते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास ते शिर्डी येथून विमानाने जळगावात दाखल होतील. त्यानंतर जळगाव विमानतळावरून ते मोटारीने जामनेरला जातील. जामनेरात ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण तसेच जीएम डायग्नोसिस सेंटरचे व्हर्च्युअल उदघाटन केल्यानंतर ते पुन्हा मोटारीने जळगाव विमानतळावर परत येणार आहेत. त्यानंतर जळगाव विमानतळावरून विमानाने थेट बिहार येथे जाणार आहेत. असा दौरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.
खडसेंकडून सस्पेन्स कायम?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जळगाव दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जामनेरात होत असलेल्या कार्यक्रमांना माजीमंत्री एकनाथ खडसे हे उपस्थित राहतील का? याबाबत उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी खडसेंनी आपल्याला त्रास देण्यात फडणवीस यांचा प्रत्यक्ष हात असल्याचा थेट आरोप केला होता. त्यानंतर खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर फडणवीस आणि खडसे एका व्यासपीठावर उपस्थित राहणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, जामनेरात होणाऱ्या कार्यक्रमांचे सर्वात आधी निमंत्रण आपण खडसेंना फोनवरून दिले आहे, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, खडसेंनी आपल्याला निमंत्रण मिळाले आहे. पण कार्यक्रमाच्या उपस्थितीबाबत उद्या ठरवू, असे सांगत सस्पेन्स कायम ठेवला आहे.