जळगाव - नागरिकत्त्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरून जळगाव महापालिकेच्या महासभेत गुरुवारी भाजप आणि शिवसेनेत जोरदार खडाजंगी झाली. सभेच्या सुरुवातीला भाजपच्यावतीने नागरिकत्त्व सुधारणा कायद्याचे स्वागत करत केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्याचवेळी या कायद्याला पाठींबा देणाऱ्यांचा निषेध करत शिवसेनेचे नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी थेट राजदंड पळवण्याचा प्रयत्न केल्याने भाजप आणि सेनेत ठिणगी पडली.
हेही वाचा - जळगाव जिल्ह्यासाठी सोमवार ठरला अपघातवार! वेगवेगळ्या अपघातात पाच ठार
जळगाव महापालिकेची महासभा गुरुवारी सकाळी 11 वाजता महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सभेला उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, आयुक्त डॉ. उदय टेकाळे उपस्थित होते. या सभेच्या सुरुवातीलाच नागरिकत्त्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरून जोरदार पडसाद उमटले. सभेला सुरुवात होताच अभिनंदनाचे प्रस्ताव मांडण्यात येत होते. यावेळी भाजपच्यावतीने नागरिकत्त्व सुधारणा कायद्याचे स्वागत करत केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. हा प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक इब्राहिम पटेल हे जागेवरून उठून थेट महापौरांच्या दिशेने चालत गेले. त्यांनी सभेच्या व्यासपीठावर ठेवलेला राजदंड उचलून घेत 'नागरिकत्त्व सुधारणा कायद्याला पाठींबा देणाऱ्यांचा निषेध असो', 'भारतीय संविधानाचा विजय असो', 'हिंदू-मुस्लिम भाई भाई', अशा घोषणा देत सभागृहातून राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न केला. नेमका काय प्रकार सुरू आहे, हे लक्षात न आल्याने गोंधळ उडाला. मात्र, हा प्रकार भाजपच्या काही नगरसेवकांच्या लक्षात आल्याने त्यांनी धावत जाऊन राजदंड पळवणारे इब्राहिम पटेल यांना सभागृहाच्या वेलमध्ये पकडले. त्यांच्या हातून राजदंड हिसकावून घेत भाजपच्या नगरसेवकांनी 'वंदे मातरम', 'भारत माता की जय', अशा घोषणा दिल्या.
हेही वाचा - जळगावशी जुळले होते श्रीराम लागूंचे ऋणानुबंध
नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक-
भाजपचे नगरसेवक सेनेचे इब्राहिम पटेल यांच्याकडून राजदंड हिसकावून घेत असताना सेनेच्या काही नगरसेवकांनी पुढे होत त्यांना प्रतिकार केला. यावेळी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. भाजपच्या नगरसेवकांनी इब्राहिम पटेल यांना निलंबित करण्याची मागणी केली. मात्र, सेनेच्या नगरसेवकांनी देखील त्याला आक्षेप घेतल्याने सभागृहात तणाव निर्माण झाला होता. दोन्ही बाजूंनी कोणीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसल्याने महापौर सीमा भोळे यांनी सभा अर्धा तासाच्या कालावधीसाठी तहकूब केली.
इब्राहिम पटेलांना सभागृहातून बाहेर काढले-
दरम्यान, सुरुवातीला सभा तहकूब झाल्यानंतर अर्धा तासांच्या कालावधीनंतर सभा पुन्हा सुरू झाली. यावेळी मात्र, सेनेचे नगरसेवक इब्राहिम पटेल, तसेच त्यांच्या कृतीला पाठींबा देणारे एमआयएमचे गटनेते रियाज बागवान यांना देखील महापौरांनी सभागृहातून बाहेर काढले. सभेला सुरुवात झाल्यानंतर भाजपचे स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव मांडला. त्याला भाजपच्या सर्व नगरसेवकांनी बाक वाजवून प्रतिसाद दिला.