जळगाव - कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील शाळा आज (मंगळवारी) उघडल्या आहेत. शाळा उघडल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांची शाळांच्या प्रवेशद्वारावरच थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. पहिल्या दिवशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी अल्प उपस्थिती लावली. भारत बंद आंदोलनामुळे शाळा उघडतील की नाही, याबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता.
कोरोनामुळे आठ महिन्यांनंतर शाळा उघडणार असल्याने सोमवारी सकाळपासून शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये वर्ग स्वच्छ करण्यासाठी कर्मचाऱ्यांची लगबग सुरू होती. वर्गांची साफसफाईसह शाळेचा परिसर निर्जंतुकीकरण करणे, सॅनिटायझर बॉटल वर्ग खोल्यांमध्ये ठेवणे तसेच बाकांची स्वच्छता करणे आदी कामांसह सर्व तयारी व नियोजन सुरू होते. मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा उघडल्या आहेत.
शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी शाळेत सकाळी लवकर दाखल झाले होते. विद्यार्थी सात वाजल्यानंतर शाळेत दाखल होण्यास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कोरोनामुळे खबरदारी म्हणून शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना फिजिकल डिस्टन्सिंग राखून वर्गात बसवण्यात आले.
हेही वाचा-कोरोनाबाधित शिक्षकांमुळे जिल्ह्यातील 102 शाळा, महाविद्यालये बंद
पालकांकडून मागवली संमतीपत्रे-
ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र, दिवाळीनंतर जिल्ह्यातील कोरोनाची वाढती स्थिती पाहता, जिल्हा प्रशासनातर्फे ७ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवून ८ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने शिक्षकांची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. पालकांकडून संमतीपत्रही मागवून घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत शाळांना सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ५२ हजार विद्यार्थ्यांच्या पालकांची संमतीपत्रे शाळांकडे आली आहेत. प्रत्यक्ष विद्यार्थी शाळेत आल्यानंतर विद्यार्थी संख्या कळेल, अशी माहिती शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांनी दिली.
हेही वाचा-ग्रामीण भागातील शाळांचे वास्तव: आदेशानुसार शिक्षकांची हजेरी; कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांची दांडी
दिवसाआड वर्ग अन् चार तासिका-
इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळांमध्ये दिवसाआड वर्ग आणि चार तासिकांचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. इंग्रजी, गणित, विज्ञान, भाषा या विषयांचे अध्यापन केले जाणार आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी बसवण्यात आला आहे. एका इयत्तेत ३० विद्यार्थी असतील तर पंधरा-पंधरा विद्यार्थ्यांच्या बॅच बनवून दोन वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना बसविले जात आहे.
मैदानी खेळ व मधली सुटी रद्द-
बहुतांश विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत हजर झाल्यानंतर संमतीपत्र जमा करण्यात आले. विद्यार्थ्यांना जेवणाचा डबा आणण्यास मनाई आहे. पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र वॉटरबॅग आणण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी एकत्रित येणार नाहीत. त्यामुळे मधली सुटीदेखील होणार नाही. मैदानी खेळदेखील घेतले जाणार नसल्याचे ओरिऑन इंग्लिश स्कूलचे प्राचार्य संजय साठे यांनी सांगितले.