जळगाव - येथील कोविड रुग्णालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोविड रुग्णालयात दाखल केलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना प्रशासनाकडून वेळेवर नाश्ता आणि जेवण मिळत नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनाच आपला जीव धोक्यात घालून कोरोना वॉर्डातील रुग्णांना नाश्ता, जेवण आणि पाणी द्यावे लागत आहे. पीपीई किट, मास्क, हातमोजे अशी सुरक्षेची कोणतीही साधने न घातलेले अनेक नातेवाईक कोविड रुग्णालयात पॉझिटिव्ह रुग्णांना नाश्ता व जेवण देत असल्याचा एक व्हिडिओ समोर आल्याने या प्रकाराला वाचा फुटली आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 83 इतकी आहे. मात्र, तरीही आरोग्य यंत्रणेला कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याची स्थिती दिसते आहे. रविवारी कोविड रुग्णालयातील भोंगळ आणि संतापजनक प्रकार समोर आला. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना वेळेवर नाश्ता आणि जेवण मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. याशिवाय डॉक्टर्स आणि नर्सेसकडून उपचारातही हलगर्जीपणा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.
कोरोना कक्षात उपचारासाठी दाखल असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांनी नाश्ता आणि जेवणाची मागणी केली की संबंधित डॉक्टर्स तसेच नर्स त्यांच्या नातेवाईकांनाच त्यांची व्यवस्था करायला लावत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, पॉझिटिव्ह रुग्णांचे अनेक नातेवाईक सर्रासपणे कोरोना कक्षात सुरक्षेची कोणतीही साधने परिधान न करता वॉर्डात फिरत असतात. याचे एका तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रणकरून सगळा प्रकार समोर आणला आहे. या संबंधित तरुणाने विविध आरोप करत आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आता केली जात आहे.