जळगाव - शहरातील शामाप्रसाद मुखर्जी उद्यानाला लागून असणार्या दुकानासमोर आज (शुक्रवारी) सकाळी 9 वाजेच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे. या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला असून, मृतदेहाची स्थिती पाहता त्याचा घातपात झाल्याची शक्यता आहे. घटनास्थळी शहर पोलीस दाखल झाले आहेत. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
जिल्हा परिषदेजवळ शामाप्रसाद मुखर्जी उद्यानाला लागून असणार्या भगवती जनरल स्टोअर्स या दुकानाच्या समोर आज सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाच्या बाजूलाच एक बिअरची बाटली फोडलेली दिसत आहे. मृतदेहावर वार केल्याच्या खुणा असून, खालील बाजूस रक्त सांडलेले आहे. त्यामुळे तरुणाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे काही दुकानदार आपली दुकाने उघडण्यासाठी आल्यानंतर त्यांना तरुणाचा मृतदेह आढळला. त्यांनी या घटनेसंदर्भात शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस त्याठिकाणी दाखल झाले.
तरुणाची ओळख अस्पष्ट-
मृत तरुणाची ओळख पटलेली नाही. सुमारे 30 ते 32 च्या दरम्यान वय असणारा तरूण हा काल सायंकाळी उशिरापर्यंत शामाप्रसाद मुखर्जी उद्यानातच फिरत होता. त्याला महापालिका कर्मचार्यांनी बाहेर काढून उद्यान बंद केले होते. यानंतर त्याचा मृतदेह आज सकाळी आढळून आला आहे, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे.